बंदुकीचा धाक दाखवत केले अपहरण; आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलावर गुन्हा दाखल
Mumbai Crime : मुंबईतील एका व्यावसायिकाचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केल्याप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनराई पोलीस याप्रकणाचा अधिक तपास करत आहेत.
Mumbai Crime : शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) अडचणीत येण्याची शक्यता आहे. व्यावसायिकाच्या अपहरणाप्रकरणी (Abduction) आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे (Raj Surve) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील (Mumbai News) गोरेगाव येथील ‘ग्लोबल म्युझिक जंक्शन’ या कंपनीच्या कार्यालयात बुधवारी हा सगळा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. बुधवारी दुपारी 10 ते 15 जणांनी ग्लोबल म्युझिक जंक्शनच्या कार्यालयात येऊन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजकुमार सिंग यांना मारहाण करून अपहरण केल्याचे समोर आले होते. हा सगळा प्रकार समोर येताच पोलिसांनी राजकुमार सिंग यांची सुटका केली आहे. मात्र या प्रकरणी पीडित राजकुमार सिंग यांच्या वतीने वनराई पोलीस (Mumbai Police) ठाण्यात स्थानिक आमदार पुत्र राज सुर्वे यांच्यासह चार जणांविरुद्ध अपहरण आणि शस्त्रास्त्र कायद्यासह अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित राजकुमार यांच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण प्रकरण साडेआठ कोटी रुपयांचे आहे, जे राजकुमार सिंग यांनी आदिशक्ती फिल्म्सचे मालक मनोज मिश्रा यांना संगीत निर्मितीसाठी दिले होते. बुधवारी दुपारी त्यांनी करार रद्द करण्यासाठी दबाव आणल्यानंतर हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांनी अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
नेमकं काय घडलं?
"मला एक फोन आला होता जो मी व्यस्त कामकाजामुळे घेऊ शकलो नाही. त्यानंतर काही लोकांनी येऊन मला बेदम मारहाण केली आणि मला माझ्या ऑफिसमधून एका कारमधून एका ठिकाणी नेले आणि मला स्थानिक आमदारांचे पुत्र राज सुर्वे यांनी धमकावले. त्यानंतर माझी कंपनी ग्लोबल म्युझिक जंक्शन आणि अदिती फिम्स यांच्यात झालेला करार रद्द करण्यासाठी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर स्वाक्षरी घेतली. खरे तर अदिती फिल्म कंपनीचे मालक मनोज मिश्रा यांनी हे सर्व त्यांच्यामार्फत करून घेतले. मी त्यांना संगीत निर्मितीसाठी दिलेले 8.5 कोटी परत द्यायला लागू नये म्हणून हे सगळे मनोज मिश्रा यांनी केला. स्टॅम्प पेपरवर सही केल्यानंतर मला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले जिथून पोलिसांनी माझी सुटका केली," अशी माहिती राजकुमार सिंग यांनी दिली.
दरम्यान, या प्रकरणात एफआयआर आधीच दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर खंडणी आणि अपहरणाचे आरोप लावण्यात आले आहेत. मुख्य आरोपी मनोज मिश्राची कंपनी आदित्य फिल्म्स आणि राजकुमार यांची कंपनी ग्लोबल जंक्शन म्युझिक यांच्यात झालेल्या वादानंतर हा सगळा प्रकार घडला आहे. राजकुमार यांनी एक संगीत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 8.5 कोटी रुपये आदित्य फिल्म्सला दिले होते. हा प्रकल्प पूर्ण झाला नाही पण पैसे परत मागितल्यानंतर मनोज मिश्राने राजकुमार यांचे अपहरण करत धमकावले. या प्रकरणात बरेच मोठे लोक गुंतलेले आहेत. त्यामुळे पोलिसांनी निःपक्षपातीपणे आणि कोणत्याही राजकीय दबावाशिवाय काम करावे अशी आमची इच्छा आहे, असे राजकुमार यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे, झी 24 तासने याविषयी आमदार प्रकाश सुर्वे यांच्याशी संपर्क केला असता या एफआयआर विषयी माहिती नाही माहिती घेऊन प्रतिक्रिया देईन असं म्हटलं आहे.