Mumbai Crime : मुंबईत (Mumbai News) वाहतूक पोलिसांच्या (Traffic Police) ड्रिंक अँड ड्राईव्हच्या कारवाईदरम्यान एका 32 वर्षीय व्यक्तीला मारहाण करून त्याची कवटी फ्रॅक्चर केल्याप्रकरणी माहीम पोलिसांनी (Mahim Police) एका हवालदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पत्नीसोबत जेवण करून पीडित व्यक्ती दक्षिण मुंबईहून घरी परतत होता. घरी परतत असताना माहीम दर्गा जंक्शनवर एका वाहतूक हवालदाराने त्याला थांबवले आणि दंड मागितला. त्यावेळी पीडित व्यक्तीने दंडासाठी पैसे नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीस हवालदाराने पीडित बाईकस्वाराला पकडून ठेवलं होते. यामुळे पीडित व्यक्तीने पोलीस हवालदाराला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. दूर ढकलल्याचा राग आल्यामुळे पोलीस हवालदाराने पीडित व्यक्तीच्या डोक्यावर ठोसे मारले. या मारहाणीत पीडित व्यक्तीच्या कवटीला दुखापत झाली आहे. तर दुसरीकडे मारहाण करणाऱ्या पोलीस हवालदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इम्रान खान असे पीडित व्यक्तीचे नाव असून भूषण शिंदे असे मारहाण करणाऱ्या वाहतूक हवालदाराचे नाव आहे. विलेपार्ले येथील रहिवासी असलेले इम्रान खान हे त्यांच्या पत्नीसह 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळी मरीन ड्राइव्हला गेले होते. तिथे फेरफटका मारून जेवणानंतर रात्री 11 च्या सुमारास दोघेही घरी निघाले. इम्रान खान यांनी पत्नीसाठी एक कॅब बुक केली आणि तिला पुढे पाठवून दिलं. त्यानंतर इम्रान खान हे त्यांच्या बाईकवरुन घरी निघाले होते. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी पहाटे 1.30 वाजता इम्रान खान माहीम दर्गा परिसरात पोहोचले. त्यावेळी तिथे ड्रिंक अँड ड्राईव्हच्या कारवाईसाठी वाहतूक पोलीस तपासणी करत होते. पोलिसांनी इम्रान खान यांना बाईकचा वेग कमी करुन बाजूला थांबवण्यास सांगितले. 


त्यानंतर एका पोलीस हवालदाराने इम्रान खान यांच्याकडे त्यांचा गाडी चालवण्याचा परवाना मागितला. मात्र आपल्याकडे आता लायसन्स नसून ते डिजीलॉकरमध्ये आहे असे इम्रान खान यांनी सांगितले. त्यानंतर कदाचित तेव्हाच पोलिसांना वाटले की मी नशेत आहे म्हणून त्यांनी मला ब्रिथ अ‍ॅनलायझरमध्ये फुंकायला सांगितले, असे इम्रान खान यांनी सांगितले.


इम्रान खान यांनी ब्रिथ अ‍ॅनलायझरमध्ये पोलिसांनी तू दारुच्या नशेत बाईक चालवत आहे असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मला दंड भरायला सांगितला आणि एका पोलिसाला बाईकवर बसून मला माहीम येथील वाहतूक चौकीत घेऊन जाण्यास सांगितले. "एका पोलिसाने मला सांगितले की मला 5,000 दंड भरावा लागेल. ज्यावर माझ्याकडे इतके पैसे नाहीत असे सांगितले. मी त्यांना माझे वाहन जप्त करण्यास सांगितले पण त्यांनी माझ्या पत्नीला बोलावण्याचा आग्रह धरला. त्यामुळे मी पत्नीला बोलवून घेतले, असे इम्रान यांनी सांगितले.


"त्यानंतर मी पळून जाऊ नये म्हणून वाहतूक पोलीस हवालदाराने माझा हात धरून ठेवला होता. पण मी त्यांचा हात पुढे ढकलला. यामुळे पोलिसाला राग आला आणि त्याने डोक्याच्या उजव्या बाजूला अनेक वेळा जोरात ठोसा मारला. त्यानंतर वेदनेने मला रडू कोसळलं. हवालदाराने मला तशाच परिस्थिती माहीम येथील वाहतूक चौकीत आणलं. तिथे माझी पत्नीही उपस्थित होती. त्यानंतर मी माझ्या पत्नीला मारहाणीबद्दल सांगितले. त्यानंतर तिने पोलिसाचा फोटो काढला. त्यानंतर आम्ही सर्वजण माहीम पोलीस ठाण्यात आलो आणि आमची तक्रार दिली," असेही इम्रान खानने सांगितले.


दरम्यान, त्यानंतर इम्रान खान यांना डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये जाऊन एक्स-रे काढला. तेव्हा एक्स-रेमध्ये त्यांच्या कवटीला किरकोळ फ्रॅक्चर झाल्याचे उघड झाले.