Veena Kapoor : ती मी नव्हेच! मृत घोषित केलेली अभिनेत्री वीणा कपूर जिंवत, पोलीसांकडे घेतली धाव
संपत्तीच्या वादातून ज्येष्ठ अभिनेत्री Veena Kapoor यांची त्यांच्या मुलानेच हत्या केल्याची बातमी पसरली आणि एकच खळबळ उडाली, लोकांनी त्यांना श्रद्धांजलीदेखील वाहिली, पण कहाणी काही वेगळीच होती
Actress Veena Kapoor Death Case : ज्येष्ठ अभिनेत्री वीणा कुमार ( Actress Veena Kapoor) यांची हत्या करण्यात आल्याची बातमी दोन-तीन दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यांच्या मुलानेच वीणा कपूर यांची निर्घृण हत्या केल्याच्या बातमीने खळबळ उडाली. पण आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. मृत घोषित करण्यात आलेल्या वीणा कपुर या जिंवत असून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये (Police Station) धाव घेत तक्रार दाखल केली आहे. एकसारखं नाव आणि एकाच परिसरात रहात असल्याने हा सर्व गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मुंबईतल्या जुहू (Mumbai Juhu Murder Case) परिसरात हत्येची एक घटना समोर आली होती. वीणा कपूर नावाच्या एका ज्येष्ठ महिलेची तिच्याच मुलाने हत्या केली. आरोपी मुलाचं नाव सचिन कपूर असं आहे. योगायोगाने याच परिसरात ज्येष्ठ अभिनेत्री वीणा कपूरही रहातात. त्यामुळे अभिनेत्री वीणा कपूरचा मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांनी अभिनेत्री वीणा कपूर यांना श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर वीणा कपूर यांच्या मुलालाही लोकांनी लाखोली वाहिली.
हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
प्रकरणाची मीडिया आणि लोकांमध्ये चर्चा सुर झाल्याने अभिनेत्री वीणा कपूर यांनी दिंडोशी पोलिस स्टेशनमध्ये (Dindoshi Police) धाव घेतली आणि याप्रकरणी तक्रार दाखल केली. आपण जिवंत असून आपल्या हत्येची खोटी माहिती पसरवण्यात आली असल्याचं त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. आपल्या मुलावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे आपण दु:खी असल्याचंही अभिनेत्री वीणा कपूर यांनी म्हटलं आहे.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल
सोशल मीडियावर (Social Media) आपला फोटो व्हायरल झाल्याने आपल्या मोठा धक्का बसल्याचं वीणा कपूर यांनी म्हटलं आहे. अनेकांनी माझ्या फोटोवर श्रद्धांजली वाहिली, तसंच माझ्या मुलाला अपमानित करण्यात आलं याचं दु:ख झाल्याचं सांगत वीणा कपूर यांनी कोणतीही माहिती न घेता आपल्या नावाने बातमी पसरवल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. आपल्या मृत्यूची बातमी व्हायरल झाल्यापासून अनेकांनी मला फोन आणि मेसेज केले. खोटी बातमी पसरवली गेल्याने माझ्या कामावरही त्याचा परिणाम झाल्याचं वीणा कपूर यांनी म्हटलं आहे.
वीणा कपूर यांच्या मुलाची प्रतिक्रिया
वीणा कपूर यांचा मुलगा अभिषेक यांनीही या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या आईच्या हत्येचा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही, असं अभिषेक यांनी म्हटलं आहे. मी माझ्या आईवर जीवापाड प्रेम करतो, सोशल मीडियावर जेव्हा आईच्या हत्येची बातमी वाचली आणि त्यासाठी मुलगा जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला, तेव्हापासून मी अस्वस्थ आहे. माझ्या तब्येतीवरही त्याचा परिणाम झाल्याचं अभिषेक यांनी सांगितलं.
हे ही वाचा : समुद्रात पोहताय? सावधान ! जेली फिशनं गीताचं उद्ध्वस्त केलं करियर
हत्या झालेल्या वीणा कपूर कोण?
मुंबईतल्या जुहू परिसरातच रहाणाऱ्या वीणा कपूर नावाच्या दुसऱ्या एका महिलेची हत्या झाली होती. या वीणा कपूर शिक्षिका होत्या. संपत्तीच्या वादातून त्यांच्या मुलानेच त्यांची हत्या केली.