एअर इंडियाच्या महिला पायलटनं संपवलं आयुष्य; कारण ठरली प्रियकराकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणूक, तो सतत...
Air India pilot ends her life : खाण्यापिण्याच्या सवयी बदलण्यासाठीसुद्धा होता दबाव... नाईलाजानं एक क्षण असा आला जिथं या 25 वर्षीय तरुणीनं संपवलं आयुष्य
Air India pilot ends her life : मुंबईतून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली असून, कामानिमित्त या शहरात राहणाऱ्या एका तरुणीनं उचललेलं टोकाचं पाऊल सर्वांनाच हादरवून गेलं. एअर इंडियासाठी काम करणाऱ्या एका 25 वर्षीय महिला वैमानिकानं मुंबईतील आपल्या राहत्या घरी डेटा केबलचा वापर करत गळफास लावून घेत आयुष्य संपवलं.
मुंबईच्या मरोळ भागामध्ये असणाऱ्या कनकिया रेन फॉरेस्ट नावाच्या इमारतीमध्ये ही तरुणी राहत होती. सृष्टी तुली असं तिचं नाव, सोमवारी सकाळी तिनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं वृत्त आहे. सदर तरुणी कामानिमित्त शहरात असून, इथं ती भाड्याच्या घरात राहत होती. पोलिसांनी या घटनेसंदर्भातील तपास हाती घेत तरुणीच्या प्रियकरावर आयुष्य संपवण्यासाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
सृष्टीच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे तिचा प्रियकर आदित्य पंडित (27) याला मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं. नातेवाईकांच्या माहितीनुसार आदित्य सृष्टीला फार त्रास देत असे, शिवीगाळ करत असे इतकंच नव्हे, तर तिच्या खाण्यापिण्याच्या निवडींवरही त्याचा दबाव असून, तो तिला मांसाहार करण्यापासून सतत थांबवत असे.
दोन वर्षांपूर्वीची ओळख, मैत्री, प्रेम आणि मग...
पवई पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सृष्टी मुळची उत्तर प्रदेशातील राहणारी असून, मागच्याच वर्षी ती जून महिन्यामध्ये मुंबईत आली होती. दोन वर्षांपूर्वीत तिची आणि आदित्यची भेट दिल्लीतील एका व्यावसायिक वैमानिकाच्या प्रशिक्षणावेळी (कमर्शियल पायलट) झाली होती. या दोघांची मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.
सृष्टीनं टोकाचं पाऊल उचलल्याचं हे प्रकरण त्यावेळी समोर आलं जेव्हा आदित्य त्याच्या कारनं दिल्लीला रवाना झाला होता. प्रवासादरम्यानच सृष्टीनं त्याच्याशी फोनवरून संपर्क साधत आपण आयुष्य संपवत असल्याचं ती बोलू लागली. तिचं हे बोलणं ऐतून आदित्यनं परतीची वाट धरली. मुंबईत पोहोचताच त्यानं तिचं घर गाठलं पण, दार आतून बंद होतं. पोलिसांच्या माहितीनुसार आदित्यनं चावी बनवणाऱ्यांकडूवन दार उघडून घेतलं आणि आत जाताच त्याच्या पायाखालटी जमीन सरकली.
हेसुद्धा वाचा : 'तिकीट हवं असेल तर हिंदीत बोलायचं, मराठी चालणार नाही', मध्य रेल्वे कर्मचाऱ्याची प्रवाशाशी अरेरावी; VIDEO व्हायरल
सृष्टीनं डेटा केबलनं आयुष्य संपवलेलं पाहताच तातडीनं सृष्टीला रुग्णालयात नेण्यात आलं. पण, तिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. दरम्यान, सृष्टीच्या घरातून कोणतंही पत्र किंवा तत्सम पुरावा सापडलेला नाही. या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी सृष्टीच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता त्यांनी तिच्या प्रियकरावर गंभीर आरोप तेले. ज्यानंतर त्यांच्याच तक्रारीच्या आधारे भारतीय दंडसंहितेअंतर्गत येणाऱ्या कलम 108 (आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं) अन्वये अटक करण्यात आलं. आरोपीला यानंतर न्यायालयापुढं हजर करत त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.