Mumbai Crime : वृद्ध डॉक्टरची हत्या करुन पळ काढणाऱ्या केअर टेकरला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अवघ्या 12 तासांत अटक केली आहे. सांताक्रुझमधील (Mumbai News) वृद्धाच्या हत्येनंतर आरोपीने घरातील दागिन्यांची चोरी करुन पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आरोपी केअर टेकरला गुजरातमधील (gujarat) अहमदाबाद येथून अटक केली आहे. कृष्णा मनबहादूर पेरियार (30) असे अटक करण्यात आलेल्या केअर टेकर नोकराचं नाव आहे. हेल्थ केअर अ‍ॅट होम या प्लेसमेंट एजन्सीकडून वृद्ध दाम्पत्याने आरोपी कृष्णाला देखरेख करण्यासाठी नेमले होते. आठच दिवसापूर्वींच आरोपी कृष्णा वृद्ध दाम्पत्याकडे कामाला लागला होता. त्यानंतर आरोपीने वृद्ध डॉक्टरची हत्या करुन पळ काढला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांताक्रूझमधील नाईक दाम्पत्याने प्लेसमेंट एजन्सीकडून देखरेखीसाठी आरोपी कृष्णाला बोलवलं होतं. मात्र सोमवारी कृष्णाने डॉ. मुरलीधर पुरुषोत्तम नाईक यांची हत्या करत सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला होता. आरोपीने मुरलीधर नाईक यांच्या तोंडात गोळा टाकून सेलोटेपने तोंड बंद केले होते. तसेच हात पाय पाठीमागे बांधून मुरलीधर नाईक यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपीनेनाईक यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाची सोन्याची आणि रूद्राक्षाची माळ काढून घेतली घरातून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच सांताक्रूझ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला. सांताक्रुझ पोलिसांनी यासंदर्भात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधासाठी 10 पथके देखील रवाना केली.


पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आरोपी कृष्णाने 85 वर्षीय डॉक्टर मुरलीधर पुरुषोत्तम नाईक यांचा सोमवारी पहाटे हातपाय बांधून, तोंडात रुमाल बांधून गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपीने मुरलीधर नाईक यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम सोन्याची रुद्राक्ष जपमाळ, त्यांचे मनगटाचे घड्याळ चोरले आणि सकाळी 9.48 वाजता सौराष्ट्र एक्स्प्रेस पकडून पळ काढला. आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीने बोरीवली येथून सौराष्ट्र एक्सप्रेस ट्रेन पकडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अहमदाबाद येथून अहमदाबादच्या जीआरपीएफ पथकाच्या सहाय्याने आरोपीला ताब्यात घेण्यात आले."


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी मोलकरीण कामासाठी घरी पोहोचली तेव्हा तिला मुरलीधर नाईक यांच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला. डॉक्टर मुरलीधर यांचे हात पाय खोलीत बांधलेले होते, तर तोंडात रुमाल कोंबला होता. त्यांचा गळा आवळून खून करण्यात आला होता. मोलकरणीने लगेच दुसऱ्या खोलीत झोपलेल्या पत्नी उमा नाईक यांना माहिती दिली. मोलकरणीने  जबाबानुसार, आरोपी कृष्णा मानबहादूर पेरियार हा डॉक्टर मुरलीधर नाईक यांच्या खोलीत जमिनीवर झोपायचा. मृत मुरलीधर  नाईक हे व्यवसायाने डॉक्टर होते आणि ते पत्नी उमा नाईक यांच्यासोबत सांताक्रूझ परिसरातील हेलिना अपार्टमेंट येथे राहत होते.