शिवसेना नेत्याच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या गँगस्टरला अखेर अटक; चीनमध्ये बसला होता लपून
Gangster Prasad Pujari : गेल्या 20 वर्षांपासून फरार असणाऱ्या फरार गँगस्टर प्रसाद पुजारी याला चीनमधून मुंबईत आणण्यात आलं आहे. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.
Mumbai Crime : गॅंगस्टर रवी पुजारीच्या टोळीला मुंबई गुन्हे शाखेने मोठा झटका दिला आहे. 20 वर्षांपासून फरार असलेल्या प्रसाद पुजारीला बेड्या घालण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रसाद पुजारीला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणलं. मुंबईत पुजारीवर खून आणि खंडणीचे डझनभर गुन्हे दाखल आहेत. 2020 मध्ये प्रसाद पुजारीवर अखेरचा गुन्हा दाखल झाला होता. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. मात्र आता त्याच्या संपूर्ण टोळीचा शहर गुन्हे शाखेने खात्मा केला आहे.
गँगस्टर प्रसाद पुजारीला शुक्रवारी रात्री 12 वाजता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टी 2 येथे आणण्यात आलं. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस उपायुक्त गुन्हे दत्ता नलावडे यांनी प्रसाद पुजारीला मुंबई गुन्हे शाखेत नेले. पुजारी याच्यावर मुंबईत अनेक खून आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. प्रसाद पुजारीवर 2020 मध्ये शेवटचा गुन्हा दाखल झाला होता. शहर गुन्हे शाखेने त्याच्या संपूर्ण टोळीचा खात्मा केला आणि त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. मात्र हद्दपारीला उशीर करण्यासाठी प्रसाद पुजारीने एका चिनी महिलेशी लग्न केले होते. पण शहर गुन्हे शाखेचे सततचे प्रयत्न थांबले नाहीत आणि आज 20 वर्षांनंतर त्याला कायद्याचा सामना करण्यासाठी मुंबईत परत आणण्यात आलं.
2020 मध्ये मुंबई गुन्हे शाखेने पुजारीच्या आईला अटक केली होती. त्यावेळी पोलिसांना पुजारीच्या ट्रॅव्हल व्हिसाची मुदत संपल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्याला लवकरच भारतात परत आणता येईल, अशी अपेक्षा होती. मात्र तसं घडलं नाही. भारतीय तपास यंत्रणांच्या तावडीतून सुटण्यासाठी पुजारीने एका चिनी महिलेशी लग्न केले होते. मात्र तपास यंत्रणांच्या अथक परिश्रमानंतर त्याला चीनमधून भारतात आणण्यात आलं. पुजारी रात्री मुंबई विमानतळावर पोहोचला.
दरम्यान, मुंबई पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद पुजारीला मार्च 2008 मध्ये चीनमध्ये तात्पुरता राहण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र त्याची मुदत मार्च 2012 मध्ये संपली. प्रसाद पुजारी ट्रॅव्हल व्हिसावर चीनला गेला होता. त्याची मुदत मे 2008 मध्येच संपला. त्यानंतर पुजारी लुओहू जिल्ह्यातील शेनझेन शहरात राहत होता.
दरम्यान, मुंबईतील विक्रोळी येथे सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना नेते चंद्रकांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबारात प्रसाद पुजारी यांचा हात होता. ही गोळीबाराची घटना 19 डिसेंबर 2019 रोजी घडली. या हल्ल्यात त्यांचे प्राण वाचले होते.