Mumbai Crime : मुंबईत (Mumbai News) सातत्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच मुंबईतील एका वसतीगृहातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या एका वसतीगृहात एका विद्यार्थ्याने जेवण बनवणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी (Mumbai Police) याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. काही दिवसांपूर्वी मुलींच्या वसतीगृहात एका सुरक्षा रक्षकाने मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता हे प्रकरण समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलांच्या शासकीय वसतिगृहात स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग करुन एक 26 वर्षीय पदव्युत्तर विद्यार्थी फरार झाला आहे. पोलिसांनी आरोपी अविनाश बनसोडे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पदव्युत्तर असलेल्या अविनाश बनसोडेवर एका सरकारी मुलांच्या वसतिगृहात महिला स्वयंपाकीसोबत छेडछाड केल्याचा आरोप आहे. अविनाश बनसोडे नावाचा आरोपी सध्या फरार आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश बनसोडे हा त्या वसतिगृहात राहत नव्हता. 14 ऑगस्ट रोजी तो वसतिगृहात राहणाऱ्या मित्रांना भेटायला गेला होता आणि त्याने रात्री तिथेच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आरोपीने महिलेसोबत छेडछाड केली आणि पळ काढला. 25 वर्षीय पीडित महिला वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावर एका खोलीत सासू आणि तिच्या दोन मुलांसह राहते. महिलेचा पती आणि इतर नातेवाईक जवळच राहतात.


15 ऑगस्टच्या पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अविनाश बनसोडेने महिलेच्या खोलीच्या खिडक्या उघडल्या आणि खोलीत प्रवेश केला. त्यानंतर झोपेत असताना आरोपी महिलेला अयोग्यरित्या स्पर्श करू लागला. तितक्यात महिला घाबरुन उठली आणि तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. महिलेचा आवाज ऐकून वसतीगृहातील इतर विद्यार्थीसुद्धा जागे झाले. त्यावेळी बनसोडेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला विद्यार्थ्यांनी पकडले आणि पोलिसांना बोलवून त्यांच्या हाती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच तो तावडीतून सुटला आणि वसतिगृहाच्या आवारातून पळून गेला. या घटनेनंतर काही वेळातच महिलेचे नातेवाईकही वसतीगृहात आले. या सगळ्या प्रकारात आरोपीचा मोबाईल खोलीतच पडला. पीडित महिलेने तो मोबाईल पोलिसांच्या हाती स्वाधीन केला आहे. 


पोलिसांनी काय सांगितले?


"आम्ही बनसोडे याच्याविरुद्ध भादंवि कलम 354 आणि 452 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आम्हाला सांगण्यात आले की तो वरळीतील वसतिगृहात राहत होता आणि सोशल वर्कमध्ये मास्टर्सचा विद्यार्थी होता. पण आता तो आता वरळीच्या वसतिगृहात राहत नाही. तसेच त्याच्या पदव्युत्तर शिक्षणाची सध्याची स्थिती देखील माहिती नाही," असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. बनसोडे हा मूळचा सोलापूरमधील गावचा रहिवासा आहे. एका पोलीस पथकाने त्याच्या गावी भेट दिली असता तिथे त्याच्या जवळचे नातेवाईक राहत नसल्याचे समोर आले आहे.