Mumbai Police : मुंबईच्या मोटार वाहन विभागात चालक असलेल्या आठ पोलीस शिपाई महिलांनी एक उपायुक्त आणि दोन पोलीस निरीक्षकांनी आपल्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. मुंबई पोलीस दलातून खळबळ उडवून देणारी बातमी समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. मोटर परिवहन विभागातील महिला कर्मचाऱ्यांवर अत्याचार झाल्याचा तक्रार अर्ज व्हायरल झाल्यामुळे पोलीस विभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या अनुंषगाने पोलीस विभागातर्फे ही सर्व अफवा आहे असे बोलले जात आहे. मुंबई पोलीस दलाने आता याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलीस दलातील परिवहन विभागातील आठ महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अत्याचार केल्याचा दावा करणारा एक अर्ज व्हायरल झाला होता. त्यानंतर माध्यमांमध्ये याबाबत बातम्या देखील समोर आल्या आहे. मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याची बाब समोर आली आले. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांच्यासोबत कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचं तसेच अशी कोणतीही तक्रार न केल्याचं समोर आलं आहे. 


व्हायरल झालेल्या पत्रात, मोटर परिवहन विभागातील आठ महिला कर्मचाऱ्यांची नावे आणि सह्या या तक्रार अर्जावर असल्याचे म्हटलं जात आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुंबई पोलिस आयुक्त आणि पोलिस सहआयुक्त यांना सादर करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून बनावट तक्रार अर्ज नेमकं कोणी पाठवलं याचा तपास आता मुंबई पोलिसांनी सुरु केला आहे.


काय म्हटलंय तक्रार अर्जात?


"आम्ही लहान गावातून आल्यामुळे त्यांनी आमचा फायदा घेतला आहे. आम्हाला ड्युटीवर कोणतंही काम न देण्याच्या बहाण्याने, दोन पोलिस निरीक्षकांनी आम्हाला डीसीपीच्या घरी नेलं आणि त्यांनी आमच्यावर एकामागून एक लैंगिक अत्याचार केले. याशिवाय डीसीपी कार्यालयात महिला कॉन्स्टेबल चालकांवरही बलात्कार करण्यात आला. दोन्ही निरीक्षकांनी या कृत्याचा व्हिडीओ शूट केला आणि त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आम्हाला ब्लॅकमेल केलं," असं या अर्जात म्हटलं आहे.


पोलिसांनी काय सांगितले?


"काही प्रसारमाध्यमे तसेच समाज माध्यमांवर मुंबई पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर अत्याचार झाल्याच्या बातम्या प्रदर्शित झाल्या आहेत. या बाबतीत सखोल चौकशी केली असता त्यामधील तथाकथीत अर्जदारांनी सदर अर्ज हा केलेला नसून कुणीतरी खोडसाळपणे अज्ञात इसमाने हा अर्ज प्रसारित केल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी सुरु आहे. याबाबत आम्ही कारवाई करण्याची तजवीज केली आहे. प्रसारमाध्यमांना विनंती आहे की बातम्या प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याची शहानिशा करणे आवश्यक आहे," अशी माहिती पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दिली.