Crime News : बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात चोरांची हातसफाई; मंगळसूत्रासह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला
Dhirendra Shastri : मीरा रोड येथील एस.के. स्टोन मैदानात बागेश्वर धाम सरकारच्या धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मैदानात तसेच मैदानाबाहेरील भागात मोठ्या प्रमाणात गर्दीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी चोरट्यांनी बाबा बागेश्वर धामच्या भक्तांवर हात साफ केले आहेत.
Bageshwar Dham : बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री (dhirendra krishna shastri) हे नाव सध्या जोरदार चर्चेत आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेल्या आव्हाहनानंतर धीरेंद्र शास्त्री हे चर्चेत आले होते. त्यानंतर धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीका केली जात होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा धीरेंद्र शास्त्री हे चर्चेत आले आहेत. बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दिव्य दरबार मीरा रोड (Mira Road) येथे शनिवारी पार पडला आहे. मात्र आता हा कार्यक्रम वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
मीरा रोड येथील एस.के. स्टोन मैदानात बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री यांच्या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी झालेल्या कार्यक्रमात साधारण एक लाखाहून अधिक भाविक उपस्थितीत होते.त्यामुळे मैदानात तसेच मैदानाबाहेरील भागात मोठ्या प्रमाणात गर्दीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत आपली हातसफाई केली. यामध्ये प्रामुख्याने महिलांना लक्ष करण्यात आले आहे. मीरा रोड पोलीस सध्या या चोरट्यांचा शोध घेत आहे.
मुंबईतील मीरा रोड परिसरात शनिवारी बागेश्वर धाम सरकारच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे लाखो अनुयायी त्यांना ऐकण्यासाठी आले होते. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम रात्री नऊ वाजता संपला. एकीकडे लोक कार्यक्रमस्थळावरुन घरी निघाले होते तर दुसरीकडे सुमारे 50 ते 60 लोकांचा जमाव मीरा रोड पोलीस ठाण्यात पोहोचला होता.
मीरा रोड पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या लोकांमध्ये बहुतांश महिला होत्या. कार्यक्रमादरम्यान त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्राशिवाय सोन्याची चेनही चोरीला गेल्याचा आरोप महिलांनी केला आहे. स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 36 महिलांनी मंगळसूत्र आणि गळ्यातील चेन चोरीच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत. बागेश्वर बाबाल ऐकण्यासाठी आलेले असताना दागिने चोरीला गेल्यामुळे महिला खूपच अस्वस्थ झाल्या आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेस आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बाबेश्वर धामच्या कार्यक्रमाला विरोध केला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती. भाजप आमदार गीता जैन आणि जिल्हाध्यक्ष रवी व्यास यांनी शनिवार आणि रविवारी प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
दुसरीकडे, धीरेंद्र शास्त्री यांना पुन्हा एकदा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिलं आहे. 'शात्री हे चमत्काराने व दैवीकृपेने असाध्य आजार बरे करण्याचे जाहीर दावे करतात. आधुनिक वैज्ञानिक कसोट्यांच्या आधारे हे दावे सिद्ध करून अंनिसचे 21 लाख रुपयांचे आव्हान त्यांनी स्विकारावं," असे अंनिसने म्हटलं आहे. अंनिसने या संदर्भातील एक परिपत्रक जारी केलं आहे.