धक्कादायक, वर्षभरात डॉक्टरला तीन वेळा कोरोना, लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही पॉझिटिव्ह
Covid-19 Updates: मुंबईत कोरोना (Covid-19) संसर्गाची एक अनोखी घटना समोर आली आहे. एक डॉक्टर तीन वेळा कोरोनाच्या विळख्यात सापडली.
मुंबई : Covid-19 Updates: मुंबईत कोरोना (Covid-19) संसर्गाची एक अनोखी घटना समोर आली आहे. एक डॉक्टर तीन वेळा कोरोनाच्या विळख्यात सापडली. आश्चर्यकारक बाब म्हणजे या डॉक्टराने लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतरही ही महिला डॉक्टर पॉझिटिव्ह आली. त्यानंतर डॉ. सृष्टी हलारी (Shrushti Halari) यांचा नमुना जीनोम सिक्वेंन्ससाठी गोळा केला गेला आहे, त्याचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर त्यांना तिनदा कसा कोरोना झाला याचा उलगडा होणार आहे.
लस घेतल्यानंतर कोरोना झाला
एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, डॉ. सृष्टी हलारी पहिल्यांदा जून 2020 मध्ये कोरोना विषाणूने संक्रमित झाल्या. यानंतर, एप्रिल 2021 पर्यंत त्यांनी कोरोना लसचे दोन्ही डोस घेतले होते. असे असूनही, 29 मे रोजी त्या पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. तथापि, यावेळी त्यांना कोरोना संसर्गाची सौम्य लक्षणे दिसली आणि त्या घरीच क्वारंटाईन झाल्यात. आता त्या यातून बऱ्या झाल्या आहेत.
दोनदा संसर्ग झाल्यावरही कोरोना विषाणूने डॉ. सृष्टी यांचा पाठलाग सोडला नाही आणि 11 जुलै रोजी त्यांना तिसऱ्यांदा या साथीच्या विषाणूची लागण झाली. धक्कादायक बाब म्हणजे एप्रिलमध्येच संपूर्ण कुटुंबाचे कोरोना लसीकरण झाले होते, त्यानंतरही, विषाणूने त्यांना दोनदा घेरले.
काही नवीन स्ट्रेन नाही ना?
बीएमसीच्या वीर सावरकर हॉस्पिटलच्या कोविड वॉर्डात (Covid Ward) सृष्टी ड्यूटी करत असल्याच्या प्रकरणात सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. डॉक्टर हा कोरोनाचा नवीन स्ट्रेन आहे की नाही, हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. एक व्यक्ती एकाच वर्षात 3 वेळा कोरोना संक्रमित होण्याचा हा धक्कादायक प्रकार आहे.
डॉक्टर सृष्टी यांना तीन वेळा कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना जास्त त्रास सहन करावा लागला. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला रुग्णालयात दाखल करावे लागले, असे डॉ. सृष्टी यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर माझ्याकडे चांगले अँटीबॉडीज देखील होते. लसीने आपले कार्य केले आहे. आता सृष्टीचा केस स्टडी केला जात आहे, जेणेकरून अशा अनोख्या संसर्गाचे कारण शोधता येईल.
डॉक्टरांचा असा विश्वास आहे की बरेच लोक असे आहेत की लस डोस घेतल्यानंतरही त्यांना संसर्ग होऊ लागला आहे. जरी त्यांच्यात गंभीर लक्षणे नसतात आणि त्वरीत बरे होतात. सृष्टीच्या बाबतीतही डॉक्टरांना असा संशय आहे की व्हायरस पुन्हा सक्रिय होऊ शकतो आणि कोरोना टेस्टमध्ये काही चूक होऊ शकते.