तुम्हाला लुटणारा घोडा मीटर असा ओळखा
रेल्वेनंतर आता रिक्षा आणि टॅक्सीमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी.
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया,मुंबई : रेल्वेनंतर आता रिक्षा आणि टॅक्सीमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी. मुंबईत अनेक रिक्षा आणि टॅक्सी चालक मीटर मध्ये छेडछाड करून प्रवाश्यांची लूट करत आहेत. प्रवास करण्यासाठी लाखो मुंबईकरांचं हक्काचं साधन म्हणजे टॅक्सी किंवा रिक्षा. मात्र यातल्याच अनेक टॅक्सी आणि रिक्षा मध्ये आहे घोडा मीटर. हा घोडा मीटर तुमची फसवणूक करतो या घोडा मीटर मुळे दुप्पट किंवा त्यापेक्षा अधिक भाडं तुमच्याकडून आकारलं जातंय.
शिवसैनिक असणाऱ्या नितीन नांदगावकर यांनी या सगळ्याचा भांडाफोड केला आहे. टॅक्सी आणि रिक्षा चालक त्यांच्या स्टेरींग च्या बाजूला कुणाला दिसणार नाही अस एक बटन लावतात आणि रिक्षा टॅक्सी चालू झाल्यावर हे बटन दाबतात आणि त्यानंतर मीटर फास्ट पडू लागतो. रिक्षा-टॅक्सीला घोडा मीटर लावला आहे का नाही? हे कसं ओळखाल, याचं प्रात्यक्षिकही नितीन नांदगावकर यांनी दिलं.
मीटर सुरु असताना पैसे दाखवले जातात तिकडे सगळ्यात शेवटी एक डॉट ब्लिंक होत असतो. सिग्नलवर रिक्षा-टॅक्सी थांबली असतानाही हा डॉट ब्लिंक होत असेल तर तुमची लूट होत आहे हे लक्षात घ्या. या फोटोमध्ये मीटरमध्ये दिसणारं भाडं १८.०० एवढं आहे. सिग्नलवर तुमची रिक्षा थांबली असेल तेव्हा १८.००च्या पुढे असणारा डॉट बंद होणं गरजेचं आहे. पण बरेचवेळा सिग्नलवरही हा डॉट ब्लिंक होत असतो.
मुंबईतल्या विविध टर्मिनस,विमानतळावर अश्या पद्धतीने घोडा मीटर लावून प्रवाश्यांना फसवलं जातंय त्यात बाहेरून येणाऱ्या प्रवाश्यांची जास्त फसवणूक होतेय. प्रवाश्यांची उघड उघड होणारी ही लूट थांबली पाहिजे त्यासाठी आर टी ओ प्रशासनाने हे कृत्य करणाऱ्या मुजोर चालकांवर तात्काळ कारवाई केलीच पाहिजे...मात्र त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे प्रवाश्यांनी सतर्क राहाणं गरजेचं आहे.