मुंबई: महाराष्ट्रात फडणवीसांचे आणि केंद्रात मोदींचे राज्य येताच हिंदुत्ववाद्यांना त्यातल्या त्यात बरे दिवस येतील असे वाटले होते, पण रोजच भरवशाच्या म्हशीला टोणगा होत आहे. आजही बंधने फक्त हिंदूंच्या सण-उत्सवांवरच येत आहेत. ही मुस्कटदाबी हिंदूंच्या बाबतीत काँग्रेस राजवटीत व्हायची असे आरोप तेव्हा झाले. पण आता भाजप राज्यात ती जरा जास्तच होताना दिसत आहे, असी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान, ही टीका करतानाच 'मुख्यमंत्री फडणवीस यांचा कारभार गतिशील आहे, अशा जाहिराती करणाऱ्यांनी गणेशोत्सवात दंडेली करणाऱ्यांना रोखण्याची गतिशीलता दाखवावी. नाहीतर देश, देव आणि धर्मासाठी शिवसैनिकांना भगव्याचे तेज दाखवावे लागेल. कायद्याची भीती आम्हाला दाखवू नका, असा इशाराही ठाकरे यांनी दिला आहे.


हा ‘अॅट्रॉसिटी’चाच प्रकार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील गिरगावात गणेशोत्सवाचे मोठे मंडप घालण्यास मनाई केल्यावरून पक्षाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दैनिक सामनातून उद्धव ठाकर यांनी सरकारवर टीका केली आहे.  जे न्यायालय महाराष्ट्राच्या सीमा प्रश्नाबाबत निर्णय देऊन कानडी जोखडाखालील मराठी बांधवांना न्याय देऊ शकत नाही ते न्यायालय हिंदू सण-उत्सवाबाबत मार्गदर्शक नियमावली तयार करते व त्या नियमावलीची भेंडोळी नाचवत नोकरशाही गणेशोत्सवाला आडवी जाते. हा एक प्रकारे ‘अॅट्रॉसिटी’चाच प्रकार आहे, पण हिंदूंच्या सण- उत्सवांवरील अत्याचार तुमच्या त्या अॅट्रॉसिटी कायद्यात मोडत नाहीत. त्यामुळे देवाधिराज गणरायही मुकाटपणे हे अत्याचार सहन करतात. अर्थात हिंदूंची, देवाधर्माची रक्षणकर्ती शिवसेना हे सर्व घडू देणार नाही. दुर्गापूजा रोखू पाहणाऱ्या ममता बॅनर्जी या भाजपच्या दृष्टीने हिंदुद्रोही ठरल्या. मग गणेशोत्सव रोखू पाहणाऱ्यांना आता कोणती उपाधी द्यावी?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.


मोदी हे म्हणे मुसलमानी टोपी ‘पेहनत’ नाहीत


उत्तर प्रदेशातील मुगलसराय नामक रेल्वे स्थानकाचे नामांतर पंडित दीनदयाल उपाध्याय नावाने केले म्हणून भाजपवाले हिंदुत्ववादी असल्याचे ढोल पिटत आहेत, पण ज्या महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचा जागर व्हावा म्हणून सार्वजनिक गणेश उत्सव साजरे केले तो गणेशोत्सवच अडचणीत आला तरी हे गप्प बसले आहेत. पंतप्रधान मोदी हे म्हणे मुसलमानी टोपी ‘पेहनत’ नाहीत म्हणून ते हिंदुत्ववादी असा प्रचार सुरू आहे. पण मुसलमानी टोप्या घालणाऱ्या काँग्रेजी राजवटीतदेखील हिंदूंच्या सण-उत्सवांचे असे धिंडवडे कधी निघाले नव्हते, असे आता दुर्दैवाने म्हणावेसे वाटते, असा हल्लाबोलही ठाकरे यांनी केला आहे.