घाटकोपर विमान दुर्घटना, अपघात नव्हे खून आहे; मृतांच्या नातेवाईकांचा आरोप
या प्रकरणी खूनाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी घाटकोपर पोलीस ठाण्यात करण्यात आलीय.
मुंबई: राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या मुंबईतील घाटकोपर इथं आठ जूनला घडलेल्या विमान दुर्घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. हा अपघात नसून खून असल्याचा गंभीर आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलाय. तक्रार करुनही या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा का नोंदवला नाही असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केलाय.
दरम्यान, पुढील सात दिवसांत गुन्हा नोंदवला नाही तर स्वतःला अटक करुन घेऊ, अशी भूमिका मृतांच्या नातेवाईकांनी आणि भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी घेतलीय. विमान कंपनीत माजी मंत्र्याचा मुलगा असल्यानेच पोलीस गुन्हा नोंदवत नसल्याचा आरोपही सोमय्या यांनी केलाय. जे विमान भंगारमधून आणले ते पुन्हा दुरुस्त करून उडवण्याची परवानगी कशी दिली? आणि हवामान खराब असताना बळजबरीने विमान उडवायला का भाग पाडलं असा सवाल महिला वैमानिकाच्या नातेवाईकांनी विचारलाय.
दरम्यान, या प्रकरणी खूनाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी घाटकोपर पोलीस ठाण्यात करण्यात आलीय.