राज्यपाल नियुक्त १२ जागांचा प्रस्ताव मंजूर
काँग्रेसची यादी बंद लिफाफ्यात मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली
मुंबई : राज्यपाल नियुक्त बारा जागांचा प्रस्ताव आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची नावे अद्याप निश्चित नसल्याची माहिती मिळत आहे. तर शिवसेनेच्या नावांबाबतही गोंधळाची स्थिती असल्याचं समजत आहे.
केवळ काँग्रेसने आपल्या वाट्याच्या चार नावांची यादी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली आहे. मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेची नावं अद्याप निश्चित नसल्याने राज्यपाल नियुक्त १२ जागांची यादी राज्यपालांकडे पाठवायला आणखी विलंब लागणार आहे. दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १२ जागांच्या प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसची यादी बंद लिफाफ्यात मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या ४ महिन्यांपासून रखडलेल्या विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त जागांसंदर्भात काँग्रेसची काल मध्यरात्री खलबतं झाली. काँग्रेसकडून चार जागांसाठी तब्बल ९ नावांची चर्चा आहे. आता यापैकी नेमकं कोणाला उमेदवारी मिळते याबाबत उत्सुकता आहे.