मुंबई : शहर आणि रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाले मुद्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे बंधु आमने-सामने येण्याचे संकेत मिळालेत. ठाकरे बंधुमधील 'सामना' रंगण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एल्फिन्स्टन येथे झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांचा बळी गेल्यानंतर रेल्वे स्टेशन बाहेरील अनधिकृत फेरीवाले हटविण्याच्या मागणीला जोर आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मुद्द्याला हात घातला. फेरीवालेविरोधात संताप मोर्चा काढून रेल्वे प्रशासनाला इशाराच दिला. त्यानंतर १६ दिवशी खळ्ळ खट्याक झाले आणि फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उचला गेला. यावरुन वादाची ठिणगी पडत आहे.


मुंबईतील फेरीवाल्यांच्या बाजुने मुंबई काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय निरुपम यांनी दंड थोपटलेत. त्यांनी फेरीवाल्यांना चेतवले. त्यांनी बेकायदेशीर मेळावा घेत फेरीवाल्यांना जशास तसे उत्तर देण्याचे फर्मान सोडले. त्याचे पडसात मालाड येथे दिसून आलेय. मनसेच्या कार्यकर्त्यांवर थेट जीव घेणा हल्ला केला. यात मनसेचा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला. त्यामुळे मनसेने आक्रमकपणा घेतलाय. जर फेरीवाल्यांवर कारवाई केली नाहीतर, न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय. ही कारवाई केली नाही तर तो न्यायालयाचा अवमान म्हणून याचिका दाखल करु, असा इशारा मनसेने दिलाय.


तर मराठीच्या मुद्द्यावरुन या काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी मनसे कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचे सांगत हा मराठीच्या अस्मितेवर हल्ला असल्याचे म्हटलेय. नितेश राणे यांनी गंभीर जखमी मनसे कार्यकर्त्याची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. आता तर शिवसेनेने या वादात उडी घेतलेय.



मुंबई फेरीवाला सेनेच्यावतीने मुंबई महानगरपालिका फेरीवाला विरोधी कारवाई बंद करा, यासाठी फेरीवाल्यांची सभा घेण्यात येणार आहे. रविवारी दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता गोरेगाव पूर्व येथे ही सभा होत आहे. मुंबई फेरीवाला सेना गोरेगाव विभागातील सर्व फेरीवाल्यांची सभा आयोजित करण्यात आल्याचे मुंबई महानगर पालिका (फेरीवाला समिती) अध्यक्ष अशोक देहेरे यांनी म्हटलेय. त्यामुळे आता दोन्ही ठाकरे बंधुमध्ये या मुद्द्यावर वातावरण तापण्याची शक्यता आहे.