एकमेकींचे केस खेचले, डोकी फोडली, महिलांच्या डब्ब्यात तुफान राडा... Video व्हायरल
मुंबई लोकलमध्ये महिलांच्या डब्यात तुफान राडा, महिला पोलीसही जखमी
Mumbai Local : मुंबई लोकलमध्ये महिलांच्या डब्यात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरुन तीन महिलांमध्ये हाणामारी झाली. ठाणे पनवेल लोकलमध्ये (Thane-Panvel Local Train) ही घटना घडली असून हाणामारीचा हा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झाला आहे.
नेमकी घटना काय
ठाणे लोकलने मायलेकी आणि त्यांची नात पनवेलच्या दिशेने प्रवास करत होत्या. ट्रेनमध्ये गर्दी असल्याने त्यांना बसायला जागा मिळाली नाही. यावेळी कोपरखैरणे इथं एक महिला डब्यात चढली. तुर्भेला जागा झाल्याने ती महिला सीटवर बसली. पण त्या लहान मुलीला बसू दिलं नाही म्हणून मायलेकीने त्या महिलेबरोबर वाद घालायला सुरुवात केली. या तिघींमध्ये शाब्दिक वाद सुरु झाला.
पण शब्दला शब्द वाढत गेला आणि वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. एकमेकींचे केस ओढत, ठोसे मारत त्या महिला एकमेकांवर तुटून पडल्या. त्यामुळे डब्यात एकच गोंधळ झाला. महिलांची आरडाओरड सुरु झाली. पुढच्या स्थानकात एक महिला पोलीस कर्मचारी भांडण सोडवण्यासाठी लोकलमध्ये चढल्या, पण या हाणामारीत त्यांनाही दुखापत झाली.
वाशी स्थानकात याबाबत गुन्हा नोंद झाला असून आरोपी महिला तक्रारदार दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे . भांडण कशावरून झाले याचाही तपास घेतला जात आहे.