central and western railway megablock in marathi: सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर  येत्या रविवारी, 18 फेब्रुवारीला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे तुम्ही जर घराबाहेर पडणार असाल तर मुंबई रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे लागणार आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाकडून दिलगीरी व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेवरील ठाणे - कल्याण अप आणि डाऊन आणि हार्बर मार्गावर सीएसएमटी ते  चुनाभट्टी/वांद्रे डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. ठाणे - कल्याण अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. परिणामी सीएसएमटीहून सकाळी 09.30 ते दुपारी 2.45 पर्यंत सुटणारी डाऊन जलद लोकल ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. त्यामुळे या लोकल निर्धारित वेळेच्या 10 मिनिटे उशीराने धावतील. तर कल्याणहून सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 दरम्यान सुटणाऱ्या जलद/अर्ध जलद लोकल कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यानच्या अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन  त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकापासून पुढे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या निर्धारित वेळेच्या 10 मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील. 


 तसेच सीएसएमटी आणि दादार येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील. तर परतीच्या सीएसएमटी आणि दादार येणाऱ्या अप मेल-एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे-विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.


हार्बर मार्गावर


हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत असेल. सीएसएमटी येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेलसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. 


पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या  अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (फलाट क्र. 8) दरम्यान 20 मिनिटांच्या अंतरावर विशेष फेऱ्या चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.