Mumbai : आज घराबाहेर पडताय? काही लोकल रद्द तर काही विलंबाने धावणार, पाहा लोकलचे वेळापत्रक
Mumbai Local News : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडणार असाल आणि लोकल प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर मेगाब्लॉकबाबत जाणून घ्या लोकलचे संपूर्ण वेळापत्रक..रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आहे.
Mumbai Local Megablock : आज साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर आधी लोकलचे वेळापत्रक पाहा. कारण रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी काही लोकल रद्द तर काही लोकल विलंबाने धावणार आहेत. यामध्ये मध्य रेल्वे (Central Railway), हार्बर रेल्वे (Harbour Railway) वर दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार तर पश्चिम रेल्वेवर (Western Railway) जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य मार्गावर
ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या लोकल 10 मिनिटे उशिराने धावतील. तर सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 पर्यंत कल्याणहून सुटणारी जलद लोकल कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर मार्गावर
पनवेल - वाशी अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत (बेलापूर/नेरुळ-खारकोपर मार्ग वगळता)
सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेलहून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणारी अप हार्बर मार्ग आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेलहून सुटणारी अप हार्बर मार्ग रद्द राहील.
सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेलून-ठाण्याकडे अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाणे ते पनवेलकडे ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या धावतील.
ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. तर बेलापूर-खारकोपर आणि नेरूळ-खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय सेवा वेळापत्रकानुसार चालतील.
पश्चिम मार्गावर
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 15.35 या वेळेत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. धीम्या मार्गावरील सर्व लोकल ब्लॉक चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान जलद मार्गावर धावतील. परिणामी या मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात येतील.