ठाण्यानजीक होतेय नवीन स्थानक; घोडबंदरच्या रहिवाशांना लोकल पकडणं सोप्पं होणार
Mumbai Local Train Update: ठाणे-मुलुंड दरम्यान नव्याने एक स्थानक उभारण्यात येत आहे. या स्थानकामुळं ठाणे स्थानकातील भार हलका होणार आहे. तर, या प्रवाशांना फायदा होणार आहे.
Mumbai Local Train Update: घोडबंदर रोड, वाघळे इस्टेट आणि पोखरण येथील नागरिकांचा लोकल प्रवास सोप्पा होणार आहे. ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान होणाऱ्या नव्या स्थानकांचा या भागात राहणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे. या नव्या स्थानकामुळं नागरिकांचा प्रवासाचा वेळ आणि प्रवास दोन्ही वाचणार आहे. सध्या या भागातून ठाणे स्थानक गाठण्यासाठी खूप अंतर कापावे लागते. तसंच, वाहतुक कोंडीमुळं कधीकधी वेळेत पोहोचण्यासही उशीर होतो.
जी.बी रोड आणि वागळे इस्टेट येथील नागरिकांना ठाणे स्थानकात जाण्यासाठी तीन हात जंक्शन पार करावे लागते. या प्रवासासाठीच त्यांना 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागतो. तर, स्थानकातही पीक अवर्सच्या वेळेत खूप गर्दी असते. नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी महानगरपालिकेने पर्याय काढला आहे.
ठाणे महानगरपालिका तीन हात नाका आणि एलबीएल रोडपासून ठाणे, मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या तीन उन्नत रस्ते बांधणार आहे. ज्यामुळं घोडबंदर रोड आणि नजीकच्या इतर परिसरातील रहिवासी आणि ठाणे-मुलुंडमधीव नागरिकांना रेल्वे स्थानकात पोहोचण्याचा वेळ कमी होणार आहे, अशी माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली आहे.
या उन्नत मार्गामुळं तीन हात नाक्यापासून नवीन स्थानकापर्यंत पाच मिनिटांत पोहोचता येणार आहे. यामुळं प्रवाशांना सध्याच्या ठाणे स्थानकातील गर्दी आणि वेळ , अंतर यापासून दिलासा मिळणार आहे. नवीन स्थानकाचे बांधकाम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विचारे यांनी दिली आहे.
ठाणे रेल्वे स्थानकात दररोज सुमारे सात लाखा रोज ये-जा करतात. त्यामुळं स्थानकातील गर्दी विभागण्यासाठी हे स्थानक महत्त्वाचे ठरणार आहे. ठाणे महानगरपालिकेने स्मार्ट सिटी उपक्रमात या प्रकल्पाचा समावेश करुन केंद्र सरकारकडे पाठवला होता. 289 कोटींच्या या प्रस्तावाला तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजुरी दिली होती. मात्र, अनेक अडथळे तेव्हा निर्माण झाले होते. अखेर 2023मध्ये कोर्टाने दिलेली स्थगिती उठवण्यात आली आहे. त्यामुळं नवीन स्थानकाच्या कामाला गती मिळाली आहे.
स्थानकासाठी आवश्यक असलेल्या 20 पिलरपैकी 11 पिलरचे काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण स्थानक 14.83 एकर जागेवर होणार आहे. त्यापैकी 3.77 एकर जागेवर रेल्वे रूळ व तळमजला 2 मजली इमारत उभारण्यात येणार आहे. तर, स्थानकावर एकूण तीन प्लॅटफॉर्म असणार असून एक होम प्लॅटफॉर्म आहे. स्थानकात तीन पादचारी पूल असणार आहेत.
नवीन ठाणे स्थानक उभारल्यानंतर या स्थानकात मुंबईला जाणाऱ्या गाड्या होम प्लॅटफॉर्मवरुन सुटणार आहेत. तसंच, कर्जत-कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या गाड्या दोन व तीन प्लॅटफॉर्मवरुन सुटणार आहेत.