कृष्णात पाटील, झी मीडिया मुंबई: कोरोना लसीचे 2 डोस घेतलेल्यांना येत्या 15 ऑगस्टपासून मुंबई उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्यास मुभा मिळणार आहे. परंतु या लसवंतांना रेल्वेचा मासिक पास किंवा तिकीट काढायचे असेल तर आधी क्यूआर कोड मिळवावा लागेल. तो कसा मिळवावा असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर त्यासंदर्भातील अधिक माहिती जणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना आणि लॉकडाऊनमुळं ठप्प झालेली मुंबईची लोकल येत्या 15 ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी पुन्हा धावणाराय. पण लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यात क्यूआर कोड बंधनकारक केल्यानं तो मिळवताना मुं बईकरांची चांगलीच दमछाक होणार आहे. हा क्यूआर कोड तीन पद्धतीनं मिळवता येणार आहे.


ऑनलाईन पद्धतीनं मिळवता येणार QR कोड


मुंबई महापालिका आणि रेल्वे पुढच्या 2 दिवसात एक मोबाईल अॅप तयार करणार आहे. या अॅपच्या मदतीनं तुम्ही ऑनलाइन क्यूआर कोड मिळवू शकता. या अॅपवर लसीचे 2 डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र अपलोड केल्यानंतर क्यूआर कोड मिळेल. हा क्यूआर कोड रेल्वे स्टेशनच्या तिकीट खिडकीवर दाखवून पास किंवा तिकीट मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. 


ऑफलाइन पद्धतीनं मिळवा
ऑफलाइन पद्धतीनं मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये जावं लागेल. लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र दाखवून क्यूआर कोड मिळवता येईल. हा क्यूआर कोड रेल्वे तिकीट खिडकीवर दाखवून पास किंवा तिकीट मिळेल.


तिसरी पद्धत आहे रेल्वे स्थानकावर क्यूआर कोड मिळवण्याची
एमएमआर परिसरातील 65 रेल्वे स्थानकांवर ही सोय असेल. लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र दाखवून क्यूआर कोड दिला जाईल.


विशेष म्हणजे येत्या काळात रेस्टॉरंट, जिम, स्विमिंग पूल अशा ठिकाणी प्रवेशासाठी दोन लस घेतल्याचं प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा विचार आहे. रेल्वे पाससाठी जनरेट झालेला क्यूआर कोड याठिकाणी प्रवेशासाठी वापरला जाण्याची शक्यता आहे.


आजमितीला मुंबईतील केवळ 18 लाख, तर एमएमआर परिसरातील 31 लाख नागरिकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत. याचाच अर्थ तब्बल 80 लाख लोकल प्रवाशांपैकी जेमतेम 10 ते 15 टक्के लोकांलाच तूर्तास लोकल प्रवास करता येणार आहे. तेव्हा बाकीच्या 85 टक्के प्रवाशांनी आता लोकल प्रवासासाठी रेल्वे स्टेशनऐवजी लसीकरण केंद्राबाहेर रांग लावण्याची गरज आहे.