मुंबई : मुंबईकरांसाठी लोकलच्या बाबतीत  शनिवार आणि रविवार अतिशय कठीण ठरला. पण सोमवारी लोकल सेवा कशी आणि कुठपर्यंत सुरू असेल, हे परिस्थितीच ठरवणार आहे, तरी देखील रेल्वेने काही माहिती प्रवाशांना दिली आहे. शनिवार दुपारी १ पासून ते रविवारपर्यंत मध्य रेल्वेची वाहतूक जवळ जवळ बंद असल्यासारखीच होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आता सोमवारी ५ ऑगस्ट रोजी मुंबई लोकलची काय परिस्थिती असेल, याबाबतीत लोकांमध्ये संभ्रम दिसून येत आहे. पण सर्वसाधारणपणे सर्वांचा अंदाज असाच आहे की, कल्याण बदलापुरात रात्रीत किती पाऊस येतो, यावर उद्याच्या लोकलची सेवा कशी सुरू राहणार यावर सर्व अवलंबून असणार आहे.


रेल्वेने मुंबई आणि उपनगरात तसेच लागून असलेल्या जिल्ह्यात पावसाने जे थैमान घातले आहे, त्यावर खालील माहिती प्रसिद्धीस दिली आहे.


सोमवार ५ ऑगस्टसाठी रेल्वेने दिलेली महत्वपूर्ण माहिती


कल्याण, बदलापूर आणि मुंबईत गेल्या दोन दिवसात झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे होणारी व्यापक आपत्ती लक्षात घेता पुढील योजना आखल्या गेल्या आहेत.


सोमवारी ५ ऑगस्ट रोजी परिस्थितीनुसार मध्य रेल्वे उपनगरी सेवा १) मध्य रेल्वे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण, २) पश्चिम रेल्वे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगाव, ३) हार्बर रेल्वे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, ४) ठाणे ते पनवेल आणि चौथ्या कॉरिडोरवरील खारकोपरपर्यंत या मार्गावर चालवतील.


हवामानातील परिस्थितीनुसार कल्याण ते बदलापूर आणि कसारा या मार्गावरील सेवा सुरू होण्याबाबत उद्या सकाळी आढावा घेऊन ठरवण्यात येणार आहे.


दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर केले आहेत, तसेच सुरू आहेत. तरी देखील रेल्वे ट्रॅकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, यामुळे सोमवारी ५ ऑगस्ट रोजी बदलापूरच्या पलीकडे सेवा शक्य होणार नाही.


हा निसर्गाचा प्रकोप आहे आणि रेल्वे प्रशासन, सेवांच्या सामान्यकरणासाठी सर्वकाही करत आहे. कृपया आम्हाला सहकार्य करावे आणि त्याप्रमाणे प्रवासाचे नियोजन करावे, असे रेल्वेकडून कळवण्यात आले आहे.