Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास आरामदायी व सूकर व्हावा यासाठी रेल्वेकडून अनेक उपाययोजना करण्यात येतात. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याच्या सूचना मध्य व पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानंतर आता पश्चिम रेल्वेने मुंबईकरांना गुड न्यूज दिली आहे. मुंबईकरांच्या सुरक्षित व आरामदायी प्रवासासाठी पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पश्चिम रेल्वेवर जादा एसी गाड्या सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एका एसी गाडीमुळं 11 ते 12 फेऱ्या सुरू करता येऊ शकतात. जशा गाड्या वाढतील तशा फेऱ्यादेखील वाढतील. एसी गाड्यांचे दरवाजे बंद असल्याच्या तुलनेत एसी लोकलचे भाडे सध्या परवडण्याजोगे आहेत, असं ते म्हणाले आहेत. 


दरम्यान, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे काही दिवसांपूर्वी मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी रेल्वेकडून करण्यात आलेल्या मान्सूनच्या तयारीचा आढावा घेतला. तसंच, रेल्वे अधिकाऱ्यांना लोकलच्या फेऱ्या आणखी कशा वाढवता येतील, यावर काम करण्याच्या सूचना दिल्या. येत्या काही दिवसांत लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते. तसंच, मुंबईकरांचा प्रवास आणखी आरामदायक व सुविधापूर्वक होऊ शकतो, अशी शक्यता आहे. 


रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 5-7 वर्षात मुंबईच्या अधिकतर स्थानकात एस्केलेटर, लिफ्टचे बांधकाम मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वे अमृत भारत स्थानकांतर्गंत रेल्वे स्थानकांना नवीन लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मालगाड्यांसाठी वेगळा मार्ग बनवण्याबरोबरच नवीन गाड्या सुरू करुन प्रवाशांवा प्रतीक्षा करावी लागणार नाही, यासाठीचा प्रयत्न करत आहोत. 


रेल्वेने सिग्नलिंग सिस्टीम सक्षम केली आहे. रेल्वे मार्गाचे आधुनिकरण केले. तर रेल्वेच्या प्रवासी कालावधीत बचत होईल. त्या दिशेने आपले प्रयत्न सुरू आहेत. पश्चिम रेल्वेवर सध्या दरदिवशी 30 ते 31 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. मेरा तिकिट मेरा इनाम ही योजना रेल्वेने सुरू केली आहे. त्याअंतर्गंत जवळपास 4 कोटींचा महसूल रेल्वेला मिळतो. मुंबई विभागात विनातिकिट प्रवाशांकडून सुमारे 90 कोटी वसूल केले आहेत.