पुढच्या पाच वर्षांत मुंबईकरांचा प्रवास आरामदायी होणार; रेल्वेमंत्र्यांनी लोकलबाबत दिली Good News
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल विस्कळीत झाली की मुंबईकरांचे खूप नुकसान होते. तसंच, गर्दीच्या वेळेत लोकल पकडतानाही त्रास होतो. यावर आता रेल्वे मंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे.
Mumbai Local Train Update: लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. लोकल विस्कळीत झाल्यावर अनेक संकटांचा सामना मुंबईकरांना करावा लागतो. लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात तसंच, गर्दीचे नियोजन कारवे, अशी मागणी सातत्याने प्रवाशांकडून केली जाते. आता प्रवाशांच्या या मागणीचा गांभीर्याने विचार करण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईकरांना आनंदाची बातमी दिली आहे. येत्या काही वर्षांत मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी व सूकर होणार आहे.
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी मुख्यालयात बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी मुंबई विभागातील प्रवाशांचा एकूण प्रवास सुलभ करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांचीही माहिती दिली. येत्या पाच वर्षात सुमारे 250 लोकल सेवांची भर पडेल. तसेच 100 मेल एक्स्प्रेस गाड्यांची भर पडेल. संपूर्ण महाराष्ट्रात होणारा मल्टिपल मेगा टर्मिनसचा विकास, हा भविष्यात महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांमधील विकासाला चालना देईल.
महाराष्ट्रात सध्या एकूण 1.3 लाख कोटी रुपयांचे काम प्रगतीपथावर असून, त्यापैकी 5877 किमी लांबीचे नवीन लोहमार्ग बांधण्याचे 41 प्रकल्प चालू आहेत. याचा खर्च रु. 81,580 कोटी इतका आहे. यामध्ये नवीन लोहमार्ग, दुहेरीकरण, आणि गेज रूपांतरण या कामाचा समावेश आहे. सध्या महाराष्ट्रातील 128 रेल्वे स्थानके अमृत स्थानके म्हणून विकसित केली जात आहेत. महाराष्ट्रातील रेल्वेची आणखी एक मोठी कामगिरी म्हणजे, 2014 पासून गेल्या 10 वर्षांत विक्रमी 929 रेल्वे उड्डाणपूल आणि अंडरब्रिज बांधण्यात आले, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, गेल्या 10 वर्षांमध्ये महाराष्ट्रात नवीन लोहमार्ग बांधण्याच्या कामाला गती मिळाली असून, वर्षाला सरासरी 183 किमी लांबीचे नवीन लोहमार्ग बांधण्यात आले. 2009-2014 दरम्यान बांधण्यात आलेल्या वार्षिक सरासरी 58 किमीपेक्षा ते 3 पट अधिक असल्याचे ते म्हणाले. नवीन रुळांच्या बांधकामाबरोबरच विद्युतीकरण करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील रेल्वे मार्गांचे आता 100% विद्युतीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्राला 15,940 कोटी
2024-25 च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी 15,940 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. 2009 ते 14 या कालावधीत महाराष्ट्राला देण्यात आलेल्या वार्षिक सरासरी रु. 1171 कोटी अर्थसहाय्याच्या ते जवळजवळ 13.5 पटीहून अधिक असल्याचे ते यावेळी म्हणाले.