Mumbai Local News : रविवार म्हटलं की रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांच्या कपाळावर आठ्या येतात. कारण ठरतं ते म्हणजे इथं असणारा मेगाब्लॉक. रेल्वे प्रशासनाच्या वतीनं काही महत्त्वाच्या कामांच्या धर्तीवर टप्प्याटप्प्यानं मेगाब्लॉक घेतला जातो. याचा सर्वाधिक परिणाम मध्य रेल्वेच्या लोकल सेवेसह हार्बर मार्गावरील लोकल सेवेवरही होतो. 29 सप्टेंबरचा रविवारही यास अपवाद नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार रविवारी मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी पाच तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी हा ब्लॉक सुरू होईल आणि दुपारी 3 वाजून 55 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक लागू असेल. ज्यादरम्यान मध्य रेल्वेवरील लोकल सेवा बाधित होणार आहेत. 


मेगाब्लॉकमुळं Central Railway च्या सीएसएमटी (CSMT) स्थानकावरून सुटणाऱ्या डाऊन धीम्या गतीच्या लोकल माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गांवर वळवण्यात येतील. तर, मुलुंडपुढे त्या धीम्या मार्गावर आणल्या जातील. 


हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक 


उपनगरिय लोकल सेवेवरही मेगाब्लॉकचे परिणाम लागू होणार असून, कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून ते सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत ब्लॉक असणार आहे. यादरम्यान वाशी, बेलापूर, पनवेलदरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार असून, कुर्ला- पनवेल/ वाशीदरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील. 


हेसुद्धा वाचा : ...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते; प्रकाश आंबेडकरांनी कोणाचा उल्लेख करत केला मोठा दावा? 


पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचेही हाल? 


मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गाप्रमाणं पश्चिम रेल्वेवरही गोरेगाव आणि कांदिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतला जाईल. शनिवारी रात्री 12 वाजता हा ब्लॉक सुरू होणार असून, रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत जवळपास 10 तासांसाठी हा ब्लॉक घेतला जाईल. 


इतकंच नव्हे, तर अंधेरी ते गोरेगावदरम्यानच्या अप आणि डाऊन हार्बर मार्गांवर रविवारी रात्री काही तांत्रिक कामांसाठी पॉवर ब्लॉक घेतला जामार आहे. ज्यामुळं रात्री 12.30 वाजल्यापासून सकाळी 10.30 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाईल. दरम्यानच्या काळात गोरेगाव हार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा बंद असेल.