ठाणे स्थानकातील गर्दी कमी होणार; ऐरोलीला जाणेही होणार सोप्पे, `हा` प्रकल्प ठरणार गेमचेंजर
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरळीत होण्यासाठी रेल्वेने अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत.
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सूकर आणि आरामदायी होण्यासाठी रेल्वेकडून विविध उपाययोजना राबवल्या जातात. रेल्वेने एकूण 12 प्रकल्प हाती घेतले आहेत. रेल्वेचा एक प्रकल्प कळवा-ऐरोली उन्नत मार्ग हा प्रगतीपथावर आहे. रेल्वेप्रवास अधिक कार्यक्षम होण्यासाठी अतिरिक्त मार्गिका म्हणून कळवा-ऐरोली उन्नत मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू असून तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्टय आहे.
ठाणे स्थानकातून लाखो लोक प्रवास करतात. त्याचबरोबर ठाणेलगतचे मुंब्रा आणि कळवा स्थानकावरदेखील गर्दीचा भार येतो. गर्दीचा हा भार कमी करण्यासाठी रेल्वेकडून कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पामुळं ठाणे स्थानकातील गर्दीचा भार कमी होणार आहे. या उन्नत प्रकल्पासाठी 476 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तसंच, या प्रकल्पासाठी 95 टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे.
ठाणे स्थानकातून मुंबईकडे येण्यासाठी आणि हार्बर मार्गावर जाण्यासाठीही गर्दी असते. ऐरोली ते कळवा उन्नत प्रकल्पामुळं वाशी ते बेलापूरहून थेट कल्याणपर्यंत ट्रेन जाईल. ऐरोली ते कळवा मार्ग जोडण्यात आल्यानंतर ठाणे स्थानकातील गर्दी आपसूकच कमी होणार आहे. तसंच, ठाणे स्थानकात जाऊन ऐरोलीला जाण्यासाठी लोकलची वाट पाहण्याची गरज उरणार नाही. त्यामुळं नवी मुंबईहून कळवा किंवा त्यापुढे प्रवास करणाऱ्या नागरिकांचा वेळ वाचणार आहे.
ऐरोली ते कळवा उन्नत मार्ग प्रकल्प पूर्ण झाल्यावर कल्याण, कर्जत, कसारा, खोपोली प्रवाशांना थेट ऐरोलीला जाण्यासाठी लोकल उपलब्ध होईल. ठाणे स्थानकातून दररोज साडेसहा लाख प्रवासी ये-जा करतात. त्यामुळं ठाणे स्थानकात गर्दी होते. मात्र, या प्रकल्पामुळं स्थानकातील गर्दी कमी होणार आहे.
कळवा-ऐरोली प्रकल्पाला नोव्हेंबर 2016 मध्ये मंजुरी मिळाली होती. मात्र, भूसंपादन आणि इतर कामांमुळं हा प्रकल्प तब्बल सात वर्ष रखडला होता. आता या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले असून येत्या तीन वर्षात प्रकल्प पूर्ण होण्याचे उद्दिष्ट आहे.