Mumbai Local Train Update: लोकलही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. लोकलला थोडा जरी उशीर झाला तरी मुंबईकरांचा संपूर्ण दिवसक्रम बिघडतो. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने प्रवाशांसाठी मोठी तरतूद केली आहे. 19 रेल्वे स्थानकांवर प्रवासी सुविधा वाढवण्यासाठी 2206 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यासोबतच दिव्यांग व्यक्तीना आरामदायक प्रवास अनुभवता यावा यावरही अधिक लक्ष देण्यात येणार आहे. रेल्वेच्या या प्रकल्पामुळं प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे हाती घेतलेल्या या प्रकल्पांमध्ये स्थानकांचा विस्तार, स्थानकांवरील प्रतिक्षागृहांचे आधुनिकीकरण, स्वयंचलित जिन्यांच्या संख्येत वाढ आणि अनेक सोयीसुविधांचा समावेश करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या एकूण 19 स्थानकांचा यात समावेश आहे. मरीन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँड रोड, लोअर परेल, प्रभादेवी, मालाड, जोगेश्वरी ,पालघर या स्थानकांचा समावेश आहे. 


पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 स्थानकांवर 69 लिफ्ट कार्यन्वित करण्यात आल्या आहेत. त्यात आणखी 13 लिफ्ट प्रगतीपथावर आहेत. दिव्यांगी व्यक्ती आणि जेष्ठ प्रवाशांसाठी पावसाळ्यानंतर आणखी 13 लिफ्ट बसवण्याचे नियोजन आहे. तसंच, पश्चिम रेल्वेवर आधीच 33 स्थानकांवर 121 स्वयंचलित जिने आहेत. राम मंदिर स्थानकात आणखी एक स्वयंचलित जिना लवकरच सुरू करण्यात येणार आहे. आणखी 12 स्वंयचलित जिन्यासाठी 20.76 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 


अपंगांसाठी खास डिझाइन केलीली शौचालय, पिण्याच्या पाण्याचे बूथ आणि स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ राखीव पार्किंगची जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर काही स्थानकात 86 व्हिलचेअरदेखील उपलब्ध करण्यात येणार आहेत. यामुळं दिव्यांग प्रवाशांना प्रवास करणे सोप्पे जाणार आहे. 


मुंबई सेंट्रल स्थानकात डिजीटल माहिती देणाऱ्या स्क्रीन लावण्यात येणार आहेत. अनेक स्थानकात ट्रेन इंडिकेटर बोर्डसह एक मार्गदर्शक प्रणाली स्थापित केली जात आहे. त्याचा खर्च 5.34 कोटी इतका आला आहे. 


अमृत भारत स्टेशनअंतर्गंत 513.16 कोटी रुपये खर्चाची 56 कामे राबवण्यात येणार आहेत. काही कामांमध्ये 17 स्थानकांवर रूफ प्लाझा म्हणून नियोजित केलेल्या किऑस्कसह 12 मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिज बांधण्यात येणार आहे.