Video: जुगाड की लेकरासाठी आईची धडपड! Mumbai Local च्या Ladies डब्यातील व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा
Mumbai Local Train Viral Video: मुंबई लोकलच्या गर्दीमध्ये आपल्या बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी या महिलेनं केलेला जुगाड पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ट्रेनमधील गर्दीमध्येही अनेकजणी या महिलेने लावलेली शक्कल पाहत राहिल्या.
Mumbai Local Train Viral Video: एकवेळेस आयआयटीमध्ये जागा मिळेल पण मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local Train) नाही असं मस्करीत म्हटलं जातं. खरोखरच पिक अवर्समध्ये मुंबई लोकलमध्ये पाऊल ठेवायलाही जागा नसते मग ती सेंट्रल लाइन असो, वेस्टर्न असो किंवा हार्बर लाईन असो. गर्दीमुळे (Mumbai Local Train Crowd) अगदी दाराला लटकूनही रोज हजारो लोक लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. अगदी जनरल डबा असो किंवा लेडीज सगळीकडे हीच स्थिती असते. त्यातही ट्रेनमध्ये शिरल्यानंतर उभं राहण्यासाठी जागा शोधणे हा एक वेगळाच टास्क असतो. अशावेळी हातात मोठं सामना किंवा लहान मुल असेल तर ट्रेनचा प्रवास टाळेलालच बरा. पण मुंबईमधील एका महिलेने या समस्येवर अनोखा उपाय शोधला असून तिने केलेला जुगाड पाहून अनेकांच्या नजरा तिच्या या कृतीवर खिळून राहिल्या.
अनेकांच्या नजरा बाळावर खिळल्या...
मुंबई लोकलच्या एक गजबजलेल्या लेडीजच्या डब्यामध्ये आपल्या लहान मुलाला घेऊन प्रवास करताना स्वत:लाही उभं राहायला जागा नसणाऱ्या एका महिलेने चिमुकल्याला चक्क सामानाच्या रॅकवर ठेवलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या बाईने आपल्या मुलालाच रॅकवर ठेवल्याचं पाहून अनेक बायांच्या नजरा या रॅकवर बसलेल्या बाळावर खिळल्या. ही महिला आपल्या बाळाची काळजी घेताना ते व्यवस्थित बसलं आहे की नाही हे वारंवार बाळाच्या पायाला हात लावून चेक करताना दिसत आहे. या व्हिडीओला हजारोंच्या संख्येनं व्ह्यूज मिळाले आहेत.
कॅप्शनही चर्चेत
हा व्हायरल झालेला व्हिडीओ मुंबईमधील नेमका कुठल्या ट्रेनमधील आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र हा व्हिडीओ 'आईने चालवलेली एक शक्कल' या कॅप्शनसहीत सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ प्रतिक्षा नायपणे या महिलेने शूट केल्याचं या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. फोटोवर 'मुंबई मॉम स्पिरीट' असं लिहिलेलं आहे.
पडले दोन गट
या फोटोखाली अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. महेश जुन्नारकर यांनी, "थोडं धोकादायक आहे. ते बाळ पटकन त्या चालू पंख्ख्यामध्ये हात घालू शकतं," अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. तर लक्ष्मी महानवरकर यांनी त्यांना आलेला एक कटू अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर केला आहे. "एक बाई कधीच दुसऱ्या बाईला अॅडजेस्ट करून घेत नाही हेच खरं आहे. स्वतःला मुलं असून पण कोणत्याच स्त्री ने पुढे होऊन तिला किंवा तिच्या लहान मुलाला अॅडजेस्ट केलं नाही. मी सुद्धा याचा अनुभव घेतला आहे मी प्रेग्नेंट आहे म्हणून चौथ्या सीटवर बसायला जागा मागितली तरी दिली नाही. एवढ्या नालायक आणि माणुसकी नसलेल्या मनाच्या बायका असतात हे त्यादिवशी बघितलं मी. शेवटी उभा राहून प्रवास केला मी," असं लक्ष्मी यांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे.
या व्हिडीओमुळे दोन गट पडले असले तरी अनेकांनी या महिलेने लावलेली शक्कल फारच भन्नाट असून आई मुलासाठी काहीही करु शकते हे पुन्हा एकदा सिद्ध होत असल्याचं म्हटलं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं कमेंट करुन नक्की कळवा.