`प्रक्रिया पूर्ण करूनच मुलाच्या कंपनीला कंत्राट`, मनसेचे आरोप मुंबईच्या महापौरांनी फेटाळले
मनसेने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी खंडन केलं आहे.
मुंबई : मनसेने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी खंडन केलं आहे. ही कंपनी २०११ सालीच स्थापन झाली होती, जी महापालिकेची व्हेंडरही आहे. रितसर प्रक्रिया पूर्ण करून सगळ्यात कमी किंमतीला कोटेशन देऊन काम मिळवलं आहे. माझा मुलगा त्या कंपनीत पार्टनर आहे, मी ते नाकारत नाही, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
महापौर असल्यामुळे आपलं नाव बदनाम करण्याचं काम केलं जात आहे, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मनसेने केलेले भ्रष्टाचाराचे सगळे आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत.
मनसेने काय आरोप केले?
महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोविड आणि जम्बो सेंटरचे कंत्राट आपल्या मुलाला मिळवून दिल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. तसंच महापौरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही संदीप देशपांडे यांनी केली आहे.
किशोरी पेडणेकर यांनी पदाचा गैरवापर करून स्वतः च्या मुलाच्या कंपनीला काम मिळवून दिले. साईप्रसाद किशोर पेडणेकर यांच्या कंपनीने गैरमार्गाने हे काम मिळवल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
आपण केलेला भ्रष्टाचार समोर येऊ नये यासाठी महानगरपालिका सभागृह चालू केले जात नाही. पंतप्रधानांपासून सर्वजण व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत असताना मुंबई महानगरपालिका बंद का, असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.