दीपक भातुसे / मुंबई : मेट्रो कारशेडच्या जागेवरुन आता राजकारण होत असल्याचे पुढे येत आहे. केंद्राकडून या जागेवर दावा केल्याने कांजूरमधील मेट्रो कारशेडच्या जागेबाबत वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारकडून राज्याच्या अधिकारांचे हनन करण्यात येत असल्याचा आरोपत सुप्रिया सुळे यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या कांजूरमधील मेट्रो कारशेडच्या जागेवर केंद्राने दावा करत  तातडीने राज्य सरकारने आपली अधिसूचना थांबवण्याची सूचना केंद्र सरकारने एका पत्राद्वारे केली आहे. यावर आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहे. भाजपकडून राज्यातील जनतेची दिशाभूल केली जात आहे, असे भाजपचे माजी खासदार किरीट सोमया यांनी केला आहे.   



दरम्यान, केंद्राच्या निर्णयाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आश्चर्य व्यक्त करत धक्कादायक गोष्ट केंद्र सरकारकडून कळली आहे. कांजूर येथील ती जमीन महाराष्ट्र सरकारची आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची जमीन असते, त्याचा त्यावर पहिला अधिकार असतो. केंद्र सरकार सातत्याने राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचे काम करत आहे. त्यांच्या कृतीतून ते दिसत आहे, हे दुर्दैवी आणि निंदाजनक आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.


भाजपचे नेते कोणत्या आधारावर टीका करत आहेत. जमीन महाराष्ट्राची आहे ती विकास कामासाठी वापरली जात आहे. या देशात केंद्र सरकार हळूहळू आणीबाणी आणत आहे, असे चित्र आहे. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. मंदिरांचे टाळे तोडण्याची भाषा मी कधीच ऐकलेली नाही. हे दुदैवी आहे, सत्ता नसल्यामुळे कदाचित त्यांना काहीच सूचत नाही, त्यामुळे कदाचित ते बिचारे असे वागत असतील. समतोल कदाचित बिघडला असावा, असा जोरदार टोला भाजपला सुळे यांनी यावेळी लगावला.


दरम्यान, लग्नाचे हॉल्स खुले करण्याची विनंती मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केली आहे. टप्प्याटप्प्याने हॉल खुले करा. दिवाळीनंतर हॉल उघडा, पण त्याचे बुकींग घ्यायला आता परवानगी द्या. त्यामुळे बॅण्डवाले, कॅटरर्स यांना दिलासा मिळेल, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.