Mumbai Mira Road : मुंबईतल्या मीरारोडमध्ये योगी पॅटर्न राबवण्यात आला. इथल्या अवैध बांधकामांवर महापालिकेनं (Mira Road Municipal Corporation) बुलडोझर (Bulldozer) फिरवलाय. मीरारोडच्या नयानगर भागात ही कारवाई करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून मीरा रोडच्या नयानगरमध्ये (Naya Nagar) दोन गटांमध्ये राडा झाल्यामुले या भागात तणाव होता. आता या भागातला तणाव निवळल्यानंतर महापालिका आणि पोलीस अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. नयानगर भागातील सर्व अतिक्रमण तोडण्याची जोरदार कारवाई करण्यात येत आहे. 21 जानेवारीला मीरा रोडच्या नयानगर भागात दोन गटात हाणामारीची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी 15 जणांना अटक करण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नया नगर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गृहमंत्र्यांनी दिले होते आदेश
नया नगर भागात दोन गटात झालेल्या वादानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आणि परिसरातील अवैध बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. गृहमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर 48 तासातच पोलिसांनी अॅक्शन घेत नया नगर परिसरातील अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला. 


21 जानेवारीला शोभायात्रेवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली होती. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने 120 जवानांची इथं फौज तैनात करण्यात आली. परिसरात पोलिसांनी फ्लॅगमार्चही केला. त्यानंतर मंगळवारी मीरा-भाईंदर पालिकेकडून परिसरातील अवैध बांधकामं तोडण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा होता. आसपासच्या सोसायटींचे गेट बंद करण्यात आले होते. दगडफेक करणारे याच परिसरातील असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 


याप्रकरणी आतापर्यंत 13 लोकांना अटक करण्यात आली आहे, यात सामिल असलेल्या इतर लोकांचीही ओळख पटवून त्यांना अटक केलं जाईल असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. 


अफवांवर विश्वास ठेऊ नका
दरम्यान, मीरारोडमधली परिस्थिती आता शांत असून लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. पुन्हा कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.