`खुशखबर` कोरोना बरोबर सरकारचा ऐतिहासिक करार - संदीप देशपांडे
संदीप देशपांडे यांनी लोकल ट्रेनच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लोकल ट्रेनच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. कोरोना बरोबर सरकारचा ऐतिहासिक करार झाल्याचं म्हणत ठराविक वेळेतच लोकलमधून फिरण्याचं कोरोनानं अश्वासन दिल्याचं ट्विट करत देशपांडे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. उद्यापासून सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेननं प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र वेळेचं बंधन असल्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा फायदा होणार नाही असंही ते म्हणालेत.
ट्विट करत संदीप देशपांडे म्हणाले, '"खुश खबर" करोना बरोबर सरकारचा ऐतिहासिक करार ठराविक वेळेतच लोकल मधून फिरण्याचे करोनाचे आश्वासन जगभरातल्या डॉक्टरांना जमले नाही ते कंपौंडर ने करून दाखवले "अभिनंदन"' सध्या त्यांचं ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सुरु होते आहे. मात्र गर्दी टाळण्यासाठी सुरूवातीला काही विशिष्ट वेळांमध्येच सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याच्या निर्णयाचं मुंबईकरांनी स्वागत केलं आहे. तर विशिष्ट वेळेतच लोकल प्रवास करण्याचं बंधन घालण्यात आल्यानं विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे.