मुंबई : राज्यात दुकानांवरच्या पाट्या मराठी ठळक अक्षरात लावण्याच्या आदेशावरुन आता राजकारण सुरु झालं आहे.  राज्य मंत्रीमंडळाने राज्यातील सर्व दुकानांवर आता मराठीत ठळक अक्षरात नावं दुकानांची नावं लिहिण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र या आदेशांना मुंबई ट्रेडर्स संघटनेचे अध्यक्ष विरेश शहा यांनी विरोध करत आदेशांचं पालन करणार नसल्याचं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावरुन शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत  विरेन शहा यांच्या मालकीच्या रुपम शॉप समोरच मोठे बॅनर लावले आहेत. त्यानंतर आता मनसेनेही मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे.


मनसेने दिला खळखट्ट्याकचा इशारा
मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी इशारा दिला आहे. संदीप देशपांडे यांनी म्हटलं की सर्व व्यापाऱ्यांचा याला विरोध नाही, बोटावर मोजता येणारे काही आहेत, जी जाणीवपूर्वक याला विरोध करत आहेत. 


अशा व्यापाऱ्यांना इतकंच सांगायचं आहे की तुम्ही महाराष्ट्रात रहाता, महाराष्ट्राच्या सुख-सुविधा वापरता, महाराष्ट्राची जमीन वापरता, मराठी माणसांसोबत व्यापार करता, महाराष्ट्राची वीज वापरता, महाराष्ट्राचं पाणी वापरता, इथे तुम्ही मराठी भाषेला विरोध करु शकत नाही, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.


तसंच ज्यांना विरोध करायचा आहे त्यांना एकच विचारायचं आहे की दुकानाची पाटी बदलण्याचा खर्च अधिक आहे की दुकानाच्या फुटलेल्या काचा बदलण्याचा खर्च अधिक आहे. याचा विचार विरोध करायच्या आधी जरुर करावा, असा थेट इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे.



या निर्णयाची राज्य सरकार कधी अंमलबजावणी कधी करत हे आण्ही बघू असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.