मुंबई : रविवारी मोनो रेल्वेच्या वडाळा ते सातरस्ता या दुसऱ्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. परंतु, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोनो खोळंबली. साधारणत: दुपारी १.३० वाजता ही घटना घडल्याचं समजतंय. मोनो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी स्थानकांवरही फुलांची सजावट दिसत होती. परंतु, आज मात्र याच फुलांची तार मोनो रेल्वेखाली आली... आणि जवळपास १० ते १५ मिनिटांसाठी मोनोचा खोळंबा झाला. मोनोच्या वडाळा स्थानकावर ही घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेब्रुवारी २०१४ मध्ये मोनोचा चेंबूर ते वडाळा हा ९ किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा सुरू झाला होता. त्यानंतर रविवारी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं. मोनोच्या ११.२८ किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्यात संत गाडगे महाराज चौक, लोअर परळ, मिंट कॉलनी, आंबेडकर नगर, नायगाव, दादर पूर्व, वडाळा पूल, आचार्य अत्रे नगर, अन्टॉप हिल, जी. टी. बी. नगर आणि भक्ती पार्क ही स्थानकं आहेत. दुसऱ्या टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर आता मोनो १९.५४ किमी लांब मार्गावर धावत आहे. 


हा प्रोजेक्ट एमएमआरडीए अर्थात महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं पूर्ण केलाय. यासाठी एमएमआरडीएनं तब्बल ११ वर्षांचा कालावधी घेतलाय.


मोनोचा डबा जळाला तेव्हा...


यापूर्वी, ९ नोव्हेंबर २०१७ रोजी पहिल्या टप्प्यातील म्हैसूर कॉलनी स्थानकाजवळ मोनोच्या डब्याला आग लागून वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेत मागच्या इंजिनला आग लागल्यामुळे इंजिनच्या बाजूचा डबा आगीत पूर्णपणे जळून खाक झाला होता. त्यानंतर तब्बल नऊ महिने विश्रांती घेतल्यानंतर १ सप्टेंबर २०१८ पासून मोनोचा पहिला टप्पा पुन्हा सुरू करण्यात आला होता.