मुंबई : कोविड-19 विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारसह बृहन्मुंबई महानगरपालिका देखील प्रयत्नशील आहे. ही लस घेऊ इच्छिणारे पात्र नागरिक लसीकरण केंद्रांवर येतात. नागरिकांसाठी लसीकरण केंद्रांवर वेगवेगळ्या सुविधा देखील दिल्या जातात, जेणेकरून लसीकरण सुलभरीत्या पार पडावे. वय किंवा इतर कारणांनी शारीरिक हालचालींवर मर्यादा येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन लसीकरणासारखे उपक्रमही महानगरपालिकेने राबवले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण आजारपणासह शारीरिक / वैद्यकिय कारणांनी अंथरूणास खिळून आहेत, असेही नागरिक आहेत. अश्या व्यक्तींना कोविड लस देता यावी, यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्यात येत आहे.


त्यादृष्टीने, सर्व मुंबईकर नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, ज्यांच्या घरात अंथरुणास खिळून असणारे (bedridden) व्यक्ती आहेत आणि ज्यांना अशा व्यक्तीचे कोविड लसीकरण करुन घ्यावयाचे आहे, अशा व्यक्तींची नावे, वय, पत्ता, संपर्क क्रमांक  अंथरुणास खिळून असण्याचे कारण इत्यादी माहिती covidvacc2bedridden@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावी. जेणेकरून अशा व्यक्तींचे कोविड लसीकरण करणे सोईचे जाईल, असे आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे.