मुंबई पालिकेकडून कोरोना चाचण्यांत वाढ, पुन्हा जम्बो कोविड केंद्र सेवेत!
Omicron Pandemic : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कोरोना चाचण्यांमध्ये (corona tests) वाढ करण्यात आली आहे.
मुंबई : Omicron Pandemic : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कोरोना चाचण्या वाढवण्याचे केंद्र आणि राज्य सरकारकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई महापालिकेकडून कोरोना चाचण्यांमध्ये (corona tests) वाढ करण्यात आली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची ही खबरदारी घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत 35 हजारांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
ओमायक्रॉन धोक्यामुळे मुंबई महापालिकेने सर्व जम्बो कोविड केंद्र सुरू करण्याचा विचार सुरू केला आहे. पण ही केंद्र चालवण्यासाठी मनपाकडे पुरेशी यंत्रणाच नाही. पाच केंद्र चालवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून निवडलेल्या संस्थांच्या नेमणुकीचा प्रस्ताव स्थायीने फेटाळला. त्यामुळे आता ही केंद्र चालवायची कशी असा प्रश्न पालिकेला पडला आहे.
तर दुसरीकडे ओमायक्रॉनला रोखण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे.परदेशातून येणाऱ्यांसाठी पाच सूत्री अॅक्शन प्लॅन महापालिकेने तयार केला आहे. धोकादायक देशांमधून येणा-यांवर बारीक नजर ठेवली जाणार आहे.मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांनी अॅक्शन प्लॅन तयार केला आहे.
10 महिन्यांनंतर मुख्य सचिवांनी घेतला डोस
दरम्यान, राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी गुरूवारी लसीचा पहिला डोस घेतला. खरे तर फ्रंटलाईन स्टाफला डोस द्यायला सुरूवात झाल्यावर तब्बल 10 महिन्यांनंतर चक्रवर्तींनी पहिला डोस घेतला. त्यामुळे एवढे दिवस त्यांनी लस का घेतली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
जेजे रूग्णालयात त्यांनी कोवॅक्सिनचा डोस घेतला. मात्र लस घेणं हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा मुद्दा आहे, असे अजब स्पष्टीकरण मुख्य सचिवांनी दिले आहे. हिवाळी अधिवेशनात लसीकरण हा अनिवार्य मुद्दा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्य सचिवांचे लसीकरण झालेले असणे गरजेचे आहे.