Mumbai BEST Bus : आर्थिक अडचणींसमवेत आणखीही काही आव्हानांशी तोंड देणाऱ्या बेस्ट अर्थात बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टला आणखी एक धक्का बसला आहे. याचे थेट परिणाम शहरातील नागरिकांवर होणार असून, त्यामुळं त्यांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणींमध्ये आणखी भर पडण्याची चिन्हं आहेत. 


बेस्टपुढील अडचणी का वाढल्या? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेस्टला वेटलीज सर्विस देणाऱ्या एका कंपनीनं एकाच वेळी एकदोन नव्हे तर, तब्बल 262 बस सेवेतून मागे घेतल्या आहेत. ज्यामुळं आता शहरातील बेस्ट बसची एकूण संख्या 3195 वरून 2933 वर पोहोचली आहे. सरसकट 8 टक्के बस कमी झाल्यामुळं आता फक्त बेस्ट नव्हे, तर प्रवाशांच्या अडचणींमध्येही भर पडली आहे. 


कोणत्या प्रवाशांना अधिक मनस्ताप? 


मुंबई शहरातील पश्चिम उपनगरं अर्थात अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी इथं प्रामुख्यानं धावणाऱ्या मिनी बस आता कमी झाल्यामुळं येथील प्रवाशांचा त्रास आणखी वाढणार आहे. सद्यस्थितीला प्रवाशांच्या गरजा पाहता बेस्टकडून इथं सर्वसामान्य सिंगल डेकर बस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि याचा थेट परिणाम बेस्टच्या मुख्य प्रवासमार्गांवर पडला. जिथं उपलब्ध असणाऱ्या बसची संख्या कमी झाल्यामुळं प्रवाशांच्या मनस्तापात भर पडली. 


बेस्टचे महाप्रबंधक अनिल दिग्गीकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार कंत्राटदार अनेक आर्थिक अडचणींशी सामना करत असून, त्यामुळं बससेवा सुरु ठेवण्यात अडचणी येत आहेत. या मुद्द्यावर सध्या चर्चा सुरू असून, प्रवाशांची गैरसोय होणार नाही हा मुख्य हेतू असेल असं त्यांनी सांगितलं. 


हेसुद्धा वाचा : महाराष्ट्रात कोणत्या मुद्द्यांवर उडणार Vidhan Sabha Election चा धुरळा? सामान्य मतदारांना कितपत महत्त्वं? 


सूत्रांच्या माहितीनुसार बेस्टच्या ताफ्यात असणाऱ्या या मिनी बसमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्यामुळं 'ऑपरेशनल लॉस' झाला आणि अनेक बस आगारातच पडून राहिल्या. दरम्यान, बेस्टच्या ताफ्यातील या मिनी बस हटवण्यात आल्यामुळं जवळपास 1200 चालक आणि बसची देखभाल करणारे कर्मचारी बेरोजगार झाले. या कर्मचाऱ्यांच्या वतीनं बेस्टच्या महाप्रबंधकांकडे एक अर्ज करण्यात आला असून, त्यामध्ये श्रमिकांच्या नोकऱ्यांना सुरक्षितता देत कंत्राटदारानं सेवा पूर्ववत न केल्यास या कर्मचाऱ्यांना बेस्टमध्ये समाविष्ट करून घ्यावं अशी मागणीही करण्यात आली आहे.