Best Bus on Atal Setu : देशातील आतापर्यंतचा सर्वात लांब सागरी सेतू अशी ओळख असणाऱ्या ट्रान्स हार्बर लिंक रोड अर्थात मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूसंदर्भात ही महत्त्वाची बातमी. 2024 या वर्षाच्या सुरुवातीलाच शहरात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. त्या क्षणापासून अनेक वाहनांनी या अटल सेतूवरून प्रवास करत अपेक्षित ठिकाणं गाठली. शहरातील वाहतू कोंडीला शह देत आणि प्रवासाच्या वेळात मोठ्या फरकानं कपात करत हा अटल सेतू अनेकांसाठीच फायद्याचा ठरला. ज्यावरून आता बेस्ट बसचा प्रवासही सुरु झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबईला थेट मुख्य मुंबई शहराशी जोडणाऱ्या या अटल सेतू मार्गावरून बेस्टच्या वतीनं प्रवासी बसची वाहतूक गुरुवारपासून (आज) सुरु झाली आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर (मुंबई) ते कोकण भवन (सीबीडी बेलापूर) अशा मार्गावर ही बस धावणार आहे.


अटल सेतूच्या लोकार्पणापासूनच या मार्गावर बेस्टची बससेवाही सुरु करण्याची मागणी अनेक स्तरांतून करमअयात आली होती. ज्यानंतर बऱ्याच गोष्टींचा सारासार विचार करत बेस्टनं बस क्रमांक एस-145 ही बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात हा प्रवास सुरु करण्याआधी बेस्टच्या वतीनं या मार्गाची चाचपणी करत त्याच अनुषंगानं हा निर्णय घेतला. 


सदर निर्णयानंतर आता सोमवार ते शनिवारदरम्यान ही बससेवा प्रवाशांच्या सेवेत रुजू असेल. कोकण भवन सीबीडी येथून दिवसातील पहिली बस सकाळी 7.30 आणि 8 वाजता निघणार आहे. तर, वर्ल्ड ट्रेड सेंटर येथून बस सायंकाळी साडेपाच आणि 6 वाजता निघणार आहे.


कसा असेल अटल सेतूवरून जाण्याचा बसमार्ग 


वर्ल्ड ट्रेड सेंटर → यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मंत्रालय) → डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक → छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (जीपीओ) → पूर्व मुक्त मार्ग अटल सेतू → उलवे नोड → किल्ले गावठाण → बामणडोंगरी रेल्वे स्थानक  → कोकण भवन सीबीडी बेलापूर 


हेसुद्धा वाचा : लोकसभा निवडणुकीआधी ठाणेकरांसाठी मोठ्या घोषणा; शहरात होणारे बदल पाहून म्हणाल 'हे भारीये!' 


वर्ल्ड ट्रेड सेंटर ते कोकण भवन सीबीडी अशा संपूर्ण प्रवासासाठी सध्या 225 रुपये इतकं बसभाडं आकारलं जाणार आहे. तर, या बस प्रवासासाठी किमान भाडं असणार आहे 50 रुपये. प्रवाशांच्या मागण्या लक्षात घेता सुरु करण्यात आलेल्या या बस सेवेचा लाभ प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात घ्यावा असं आवाहन बेस्ट प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे.