Mumbai News : असं म्हणतात, की मुंबईत येणारा कोणीही उपाशी राहू शकत नाही. इथं खिशात अगदी पाच रुपये असणारा आणि पाच लाख किंवा कोट्यवधी रुपये असणाराही पोटभर खाऊ शकतो. अशा या शहरात सध्या पालिका प्रशासनाला भलतीच चिंता लागून राहिली आहे. ही चिंता आहे, नागरिकांच्या आरोग्याची. मागील काही दिवसांपासून मुंबईतील तापमानवाढ आणि त्यामुळं जाणवणारा उकाडा या धर्तीवर पालिकेनं नागरिकांना सावध केलं आहे. वाढत्या उकाड्याचा नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम पाहता रस्त्यावर मिळणारे खाद्यपदार्ख खाणं टाळा असं पालिकेनं स्पष्ट इशारा देत सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानखुर्द येथील शॉरमा प्रकरणानंतरही अन्नातून विषबाधा होण्याची अनेक प्रकरणं समोर आली होती. जिथं काहींची प्रकृती इतकी बिघडली, की विषबाधेमुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. सतत समोर येणारी ही प्रकरणं पाहता उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये पालिकेनं सावधगिरी म्हणून नागरिकांना रस्त्यावर मिळणार खाद्यपदार्थ खाणं टाळण्याच्याच सूचना केल्या आहेत. ज्यामुळं मुंबईकर आता वडापाव, सँडविच आणि पाणीपुरीला मुकणार, असंच चित्र दिसत आहे. 


उन्हाळ्यात बाहेरील खाद्यपदार्थ खाणं टाळा 


जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार उन्हाळ्यामध्ये पदार्थांचं वाढतं तापमान पाहता त्यामध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण वाढण्याचा धोका अधिक असतो. अनेकदा अन्नपदार्थ बॅक्टेरिया, विषाणू आणि पॅरासाईटमुळं खराब होण्यास सुरुवात होते. ज्यामुळं अन्नपदार्थांतून होणाऱ्या विषबाधेचा धोका अधिक वाढतो. 


हेसुद्धा वाचा : अन्नाच्या एकाही कणाशिवाय PM Modi यांची ध्यानसाधना; त्या अध्यात्मिक ठिकाणाचा Video समोर 


रस्त्यावरील अन्नपदार्थांची विक्री करताना विक्रेत्यांनीही काही गोष्टींची काळजी घेणं अपेक्षित आहे. ज्यामध्ये गोष्टी व्यवस्थित ठेवणं, स्वच्छतेची काळजी घेणं, व्यवस्थित शिजवणं या कृतींचा समावेश आहे. शिवाय ग्राहकांनीसुद्धा Stret Food खरेदी करत असताना त्या ठिकाणची स्वच्छता, पदार्थांसाठी वापरली जाणारी भांडी किंवा कच्चा माल यावर शक्य असल्यास लक्ष द्यावं. उघड्यावर असणारे पदार्थ खाणं शक्यतो टाळावं आणि नाशिवंत पदार्थांना वेळेच्या आत संपवावं अशाही सूचना यंत्रणेनं केल्या आहेत.