मुंबईकरांनो काळजी घ्या! गणपती आगमन मिरवणुकांदरम्यान प्रशासन का देतंय हा इशारा?
Mumbai Ganeshotsav 2023 : रस्त्यावरून जाताना सतर्क राहा प्रशासनाचा इशारा, जाणून घ्या काय आहे यामागचं कारण. बातमी प्रत्येकासाठी तितकीच महत्त्वाची.
Mumbai Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाला आता अवघे काहीच दिवस शिल्लक असताना बऱ्याच मोठ्या गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरु झाली आहे. बाप्पाच्या मूर्ती मंडपांमध्ये येण्यासही सुरुवात झाली आहे. 10 फुटी, 20 फुटी अशा महाकाय मूर्ती मंडपांच्या दिशेनं रवाना होत आहेत. सर्वत्र उत्साहाचं वातावरणही पाहायला मिळत आहे. असं असतानाच मुंबईकरांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासन करताना दिसत आहे. ऐन उत्सवाच्या दिवसांमध्ये असा इशारा का, हाच प्रश्न तुम्हालाही पडतोय ना?
लाडक्या बाप्पाची मूर्ती मंडपामध्ये नेत असताना मोठ्या प्रमाणात गर्दी होते. आगमन मिरवणुकांमध्ये रस्तेच्या रस्ते वाहतुक खोळंबते आणि ही गर्दी क्षणाक्षणाला वाढतच जाते. पण, इथंही धोका नाकारता येत नाही.
सध्याच्या घडीला मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी अर्थात मोठ्या मूर्ती साकारल्या जाणाऱ्या लालबाग परळ भागातील चित्रशाळांमधून शनिवार, रविवारी तुलनेनं जास्त गणेश मूर्ती मंडपांची वाट धरतात. मात्र या आगमन सोहळ्यांच्या मार्गावरील तब्बल 13 पूल धोकादायक असल्याची बाब नुकतीच समोर आली आहे. या पुलांवरून मूर्ती घेऊन जात असताना काळजी घ्यावी तिथं जास्त वेळ थांबू नये असा इशारा पालिकेच्या पूल विभागाकडून नागरिक आणि गणेशोत्सव मंडळांना देण्यात आला आहे. पुलांच्या या यादीत सर्वाधिक रेल्वे ब्रिजचा समावेश आहे.
धोकादायक पुलांची यादी खालीलप्रमाणं...
- घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रीज
- बेलासीस मुंबई सेंट्रलजवळील ब्रीज
- फॉकलँड रेल्वे ओव्हर ब्रीज
- फ्रेंच रेल ओव्हर ब्रीज
- केनडी रेल्वे पूल
- सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रीज
- मरीन लाईन्स रेल्वे ओव्हर ब्रीज
- करीरोड रेल्वे ओव्हर ब्रीज
- दादर-टिळक रेल्वे ओव्हर ब्रीज
- प्रभादेवी- कॅरोल रेल ओव्हर ब्रीज
- महालक्ष्मी स्टील रेल्वे ओव्हर ब्रीज
हेसुद्धा वाचा : मुंबईकरांनो सावधान! 'या' 5 दिवसात हाई टाईडचा अलर्ट, बीएमसीकडून सतर्कतेचा इशारा
बहुतांशी रेल्वे पुलांवरून मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक आणि त्यावरून मिरवणुकांची ये-जा. अचानक वाढणारी गर्दी पाहता धोक्याची कोणतीही परिस्थिती उदभवू नये यासाठी आता प्रशासनानं नागरिकांना सतर्क करण्याची सुरुवात केली आहे.