Mumbai News : मुंबईतील रस्त्यांवर मिळणारे बरेच खाद्यपदार्थ अनेक खवैय्यांच्या जीभेचे चोचले पुरवत असतात. पण, अनेकदा हे पदार्थ आरोग्याच्या तक्रारींमागचं कारणही ठरतात. मानखुर्द येथे अशीच एक घटना घडली असून, या घटनेमध्ये रस्त्यावर मिळणारा शॉर्मा खाल्ल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये 15 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. दरम्यान, हा मुद्दा फक्त मानखुर्दपुरताच मर्यादित राहिला नसून, आता मुंबई शहर आणि एकंदरच राज्याच्या विविध भागांमध्येसुद्धा Street Food स्टॉलवर विक्री होणाऱ्या पदार्थांच्या निकृष्ट दर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


वर्तमानपत्रातील खाद्यपदार्थ आरोग्यास घातक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

FSSAI आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं रद्दी कागद किंवा वर्तमानवत्रांमध्ये खाद्यपदार्थ बांधून देण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश दिले होते. पण, अद्यापही या आदेशाची पायमल्ली करत खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून देणं सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. 


एकिकडे भजी, वडा, पावभाजी, पुरीभाजी, फ्रँकी हे आणि असे अनेक पदार्थ नेमके कसे तयार केले जातात याबाबतची तपासणी होत नाही, तर दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्यास घातक असतानाही हे खाद्यपदार्थविक्रेते वर्तमानपत्रांच्या कागदातूनच पुडी बांधत ते ग्राहकांना देत आहेत. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे वर्तमानपत्राची शाई अतिशय धोकादायक असते. ही शाई पोटात गेल्यास अनेक दुर्धर आजारांचा धोका संभवतो.  


हेसुद्धा वाचा : मानखुर्द शॉर्मा प्रकरणानंतर BMC कडून खाण्यापिण्याविषयी महत्त्वाच्या सूचना जारी 


पोटांचे विकार, त्वचेची अॅलर्जी, सततची पोटदुखी आणि अशक्तपणा या आणि अशा अनेक समस्या अन्नपदार्थ वर्तमानपत्रांच्या शाईच्या संपर्कात आल्यामुळं उदभवतात. त्यामुळंच पालिकेच्या वतीनं अशा प्रकारच्या कागदाचा वापर अन्नपदार्थ बांधण्यासाठी करू नये अशा सूचना सातत्यानं करण्यात आल्या आहेत. पण, त्याकडे होणारं दुर्लक्ष पाहता आता नागरिकांनाच सतर्क होण्याची वेळ आली असून, नियमांची पायमल्ली करणाऱ्या या विक्रेत्यांवर प्रशासनाचा अंकूश येण्याची गरज बळावली आहे.