Mumbai News : अटल सेतूला टक्कर देणार `हा` पूल; मानखुर्द ते वाशी टप्पा पूर्ण होताच इथूनही सुसाट प्रवास
Atal Setu च्या उपलब्धतेमुळं मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवास कमालीचा सुकर झाला. अशा या प्रवासाला आणखी सुकर करण्यासाठी नवा मार्ग दोन- तीन महिन्यांमध्ये पूर्ण होतोय...
Mumbai News : अटल सेतू (Atal Setu) अर्थात एमटीएचएल (MTHL) च्या उपलब्धतेमुळं नवी मुंबई (Navi Mumbai) आणि मुंबईच्या (Mumbai) मुख्य शहरामध्ये असणारं मोठ्या फरकानं कमी झालं. देशातील सर्वात मोठा सागरी सेतू अशी ओळख असणाऱ्या अटल सेतूवरून सुरु होणारा प्रवास तुम्हाला अपेक्षित स्थळी किमान वेळात पोहोचवतो ही बाब अनेकांसाठीच फायद्याची ठरली. अशा या अटल सेतूचीच सर्वत्र चर्चा असताना आणि वाहनचालकांसाठी हा मार्ग अनेकदा प्राधान्यस्थानी असतानाच एका नव्या मार्गानं बहुतेकांच्या नजरा वळवल्या आहेत. किंबहुना हा नवा मार्ग अटल सेतूला चांगलीच टक्कर देणार असं म्हणणंही अतिशयोक्ती ठरणार नाही.
कोणता मार्ग अटल सेतूला देणार टक्कर?
अटल सेतूला टक्कर देणारा मार्ग खरंतर नवा नाही, पण त्याची नव्यानं बांधणी होत आता तो एका नव्या रुपात वाहनचालकांसाठी सज्ज होत असल्यामुळं कुतूहल आणि उत्सुकतेनं मर्यादा ओलांडल्या आहेत. हा मार्ग म्हणजे, मानखुर्द- वाशी खाडीपूल. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार खाडीपूलाचा मुंबई- नवी मुंबईचा टप्पा जून 2024 पर्यंत पूर्ण होणार असून, ठाण्यालाही जोडणारा हा संपूर्ण मार्गच पूर्ण होण्यास मात्र नोव्हेंबर उजाडणार आहे.
सायन पनवेल महामार्गावर बांधण्यात येणारा तिसरा ठाणे खाडीपूल या मार्गावर दर दिवशी होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा देणार आहे. L&T Limited नं या पुलाच्या निर्माणाची जबाबदारी घेतली असून, साधारण 559 कोटी रुपयांच्या खर्चात उभा राहणाऱ्या या पुलाचं बांधकाम 2020 मध्येच सुरु झालं होतं. तेव्हा आता हे बांधकाम पूर्ण होत असल्यामुळं वाहनचालकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
हेसुद्धा वाचा : Shocking : जगभरातील इंटरनेट, मोबाईलसेवा होणार ठप्प; कोणाचा अतिरेक नडणार?
MSRDC च्या अधिकाऱ्यांनी सदर बांधकामाविषयी माहिती देत आतापर्यंत 73 टक्के काम पूर्ण झालं असून, मानखुर्द आणि वाशीदरम्यान बांधण्यात येणारा हा तीन मार्गिका असणारा पूल जून महिन्यापर्यंत पूर्ण होईल. तर, वाशी ते मानखुर्द पर्यंतचा त्याचा टप्पा नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचं सांगितलं. या संपूर्ण पुलाचं बांधकाम पूर्ण झाल्यास एकूण सहा लेन असणारा पूल दोन्ही दिशांची वाहतूक सुरळीत करण्यामध्ये आणि वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.
सध्याच्या घडीला वाशी खाडीपुलावरून दर दिवशी जवळपास दोन लाखांच्या जवळपास वाहनं प्रवास करतात. ज्यामुळं या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होते. पण, वाढीव मार्गिकांमुळं या समस्येवर तोडगा निघणार असल्याची आशा एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.