रविवारी रेल्वेच्या प्रवाशांना मोठा मनस्ताप; ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक बंद
Mumbai Mega Block : रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी कोणताही ब्लॉक नसणार आहे. मात्र ट्रान्स हार्बर मार्गावर अभियांत्रिकी कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mumbai Local : शुक्रवारी पश्चिम रेल्वेवर (western railway) 256 लोकल सेवा रद्द करण्यात आल्यानंतर प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गाड्यांची संख्या कमी असल्याने स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे रेल्वेकडून अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. दुसरीकडे आता मध्य रेल्वेने रविवारी ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक (mega block) घेण्याची घोषणा केली आहे. ब्लॉक कालावधीत वाशी, नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर (Trans Harbour) मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद राहील.
रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेसह इतर काम करण्यासाठी मध्य रेल्वेमधील ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे – वाशी / नेरूळदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. ठाणे – वाशी/नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे ब्लॉकच्या वेळेत ठाणे – वाशी / नेरूळदरम्यान लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेचा पॉवर ब्लॉक
मध्य रेल्वेने टिटवाळा ते कसारादरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी आणि रविवारी मध्य रेल्वेवर घोषित करण्यात आलेल्या ब्लॉकमुळं या वेळेत पाच लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच मेल आणि एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. टिटवाळा ते कसारादरम्यान अप आणि डाउन मार्गावर पादचारी पुलाच्या गर्डर उभारणीसाठी शनिवारी आणि रविवारी मध्ये रेल्वेने विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. या ब्लॉकच्या कालावधीत पाच लोकल फेऱ्या रद्द करण्यात येत आहे. तर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सुटणारी शेवटची लोकल शनिवारी रात्री 9.30 वाजता सुटणार आहे. त्याचबरोबर रात्रीच्या काही फेऱ्याही रद्द होणार आहेत.
कोणत्या गाड्या रद्द?
शनिवारीः सीएसएमटी-कसारा : रात्री 10.50, सीएसएमटी-कसारा : रात्री 12.15
रविवारीः कल्याण-आसनगाव : पहाटे 5.28, कसारा-सीएसएमटी : पहाटे 3.51, कसारा-सीएसएमटी : पहाटे 4.59
शनिवारी शेवटची लोकलः सीएसएमटी-कसारा: रात्री 9.32, कल्याण-कसारा: रात्री 11.03, कसारा-कल्याण: रात्री 10.00 पर्यंत धावणार आहेत.
तर, रविवारी कल्याण-कसारा: पहाटे 5. 48 तर, कसारा-कल्याण: पहाटे 6.10 ला धावणार आहे.