`...तर मी मुलांना मारायला सुरुवात करणार`; धारावीतल्या वादावरुन नितेश राणेंचा पोलिसांना इशारा
BJP MLA Nitesh Rane : धारावीत दोन गटात झालेल्या वादानंतर नितेश राणे यांनी तिथे भेट देऊन पोलिसांना दम भरला आहे. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी उगाच हिंदूंना मुंबईमध्ये ताकद दाखवायला लावू नका, असा इशाराही दिला.
Mumbai News : धारावीत दोन गटांत झालेल्या वादानंतर एका कुटुंबियाला मारहाण झाल्याने वातावरण तापलं आहे. या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी भाजप आमदार नितेश राणे गुरुवारी धारावीत पोहोचले होते. यावेळी पुन्हा एकदा नितेश राणे यांनी पोलिसांनाच झापलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन संबंधित जागेवरुन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जर तसं झालं नाही तर आम्ही मोर्चा काढू असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.
"येत्या सहा सात दिवसांत लॅंण्ड जिहादच्या नावाखाली जे मस्ती करत आहेत त्यांना ठीक करण्याचे काम पोलिसांनी करायला हवं. आठ दिवसांत जर इथे परिस्थिती बदललं नाही तर आम्ही आमचा तिसरा डोळा उघडू आणि तांडव काय असतो दाखवून देऊ. कलम 307 नुसार गुन्हा दाखल नाही केला तर नवव्या दिवशी असा तांडव करु पोलिसांच्या हातात परिस्थिती राहणार नाही. इथल्या लोकांना कसं साफ करायचं हे आम्हाला माहिती आहे. पोलिसांनी आणि महापालिका अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं राष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. तुम्हाला मेडल आम्ही देणार आहोत, ते नाही देणार नाहीत. म्हणून यांचे लाड करण्यापेक्षा हिंदू लोकांना सुरक्षित ठेवा. अतिक्रमणाची नाटकं आमच्या मुंबईत चालणार नाहीत. तुम्हाला काही नाटकं करायची आहेत तर पाकिस्तानला निघून जा. उगाच हिंदूंना मुंबईमध्ये ताकद दाखवायला लावू नका. आम्ही आमच्या ताकदीवर उतरलो तर तुम्हाला तुमचे घर पण आठवणार नाही," असा इशारा नितेश राणे यांनी दिला.
"324 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केस बनवा मी बसलोय इथे. या लोकांचे जबाब घ्या. 307 कलम लावा. उद्या इथे दंगली होतील. यांना काही झालं तर आम्ही गप्प बसणार का? तुम्ही आहात म्हणून आम्ही गप्प आहोत. नाहीतर तुम्हीतर बाजूला सुट्टीवर जा मी करतो एकेकाला बरोबर. मी नंतर अचानक इथे येणार आहे. तिथे फुटबॉल खेळताना दिसलं तर मुलांना मी मारायला सुरुवात करणार," असा इशारा नितेश राणे यांनी पोलिसांना दिला.
"या पद्धतीचा कारभार पोलिसांना आणि महापालिकेला करायचा असेल तर कदाचित पोलीस विसरले असतील की राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. अधिकाऱ्यांना उत्तरं द्यावं लागतील. म्हणून मी फक्त त्यांना आता सात दिवसांचा वेळ देऊन चाललो आहे. त्यांनी जर इथल्या हिंदू कुटुंबियांना सुरक्षित ठेवलं नाही तर आम्ही इथे मोठा मोर्चा काढणार," असेही नितेश राणे म्हणाले.
याआधी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य
काही दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यातील निंबा फाटा येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या सभेत बोलताना नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. माझ्या कुठल्याही वक्तव्यावर पोलीस माझं काही बिघडवू शकत नाही. ते व्हिडिओ काढतायेत पण घरी जाऊन फक्त बायकोला दाखवतील, असं धक्कादायक विधान नितेश राणे यांनी केलं.
"मला काही करु शकणार नाही. पोलिसांना माझे भाषण रेकॉर्ड करु दे. जास्तीत जास्त बायकोला दाखू शकणार आणि काही करु शकणार आहे. आमच्या राज्यात आमच्यावर काय करु शकाल. जागेवर राहायचं आहे. राजरोस पद्धतीने पाहिजे तिथे तुमच्या इथे अतिक्रमण सुरु आहे," असे नितेश राणे म्हणाले होते.