Kamathipura Fire Mumbai : मुंबई गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बुधवारी गोरेगावमध्ये लागलेल्या आगीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ग्रॅंट रोडमध्ये आणखी एकाचा जीव गेला आहे. गुरुवारी रात्री ग्रॅंट रोडच्या कामाठीपुरा परिसरात एका हॉटेलला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. मध्यरात्री लागलेल्या या भीषण आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक झालं आहे. अग्निशमन दलाच्या तब्बल 16 गाड्यांनी सहा तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. अग्निशमन दलाकडून सध्या कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रँट रोडच्या कामाठीपुरा भागात असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये रात्री 2 वाजता ही भीषण आग लागली. ग्रँट रोडवरील कामाठीपुरा येथील रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. आगीमुळे जवळचा एक मॉल आणि एक उंच इमारत रिकामी करण्यात आली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर झाल्या होत्या. ही आग इतकी भीषण होती की त्याच्या ज्वाळा लांबूनही दिसत होत्या. सुरुवातीला अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी हजर होत्या. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या गाड्या वाढविण्यात आल्या.


ग्रँट रोडवरील कामाठीपुरा येथील रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे. अग्निशमन दलाला बाथरूममध्ये अज्ञात पुरुषाचा जळालेला मृतदेह आढळून आला. त्याचा मृतदेह जेजे रुग्णालयात नेण्यात आले. इतर जखमी किंवा बेपत्ता व्यक्तींबाबत चौकशी सुरू आहे. आग विझवण्यासाठी एकूण 16 अग्निशमन दल घटनास्थळी उपस्थित असल्याचे मुंबई अग्निशमन विभागाने सांगितले.


तब्बल सहा तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. आगीमुळे जवळचा एक मॉल आणि एक उंच इमारत रिकामी करण्यात आली आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरा अग्निशमन दलाच्या चार तुकड्या घटनास्थळी रवाना झाल्या होत्या. रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या भीषण आगीचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. रेस्टॉरंटमधून मोठ्या ज्वाळा निघत असल्याचे दिसून येत आहे. 



दरम्यान, बुधवारी मुंबईतील सांताक्रूझ परिसरात एका बहुमजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली होती.  महेश नगर येथील अनमोल प्राईड या 27 मजली इमारतीच्या 26 व्या मजल्यावर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. या आगीत तारा वाघेला यांचा मृत्यू झाला. तसेच पार्किंगमधील 15 हून अधिक वाहने जळून खाक झाली.