Mumbai News : मुंबईतल्या पापा पंचो दा ढाबामध्ये (Papa Pancho Da Dhaba) जेवणात उंदराचे (rat) मेलेले पिल्लू सापडल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मुंबईतील या ढाब्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये एका ताटामध्ये (chicken curry) मेलेले उंदराचे पिल्लू दिसून येत होते. ग्राहकाने चिकन करी मागवल्यानंतर त्याला दिलेल्या जेवणात एक मृत उंदीर सापडला होता. हे पाहून त्याने जेवणाचा व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर टाकला. या घटनेनंतर पोलिसांनी (Mumbai Police) ढाब्याचा व्यवस्थापक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. त्यानंतर आता या ढाब्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्राहकाच्या ताटात उंदीर सापडल्यानंतर हा ढाबा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) ग्राहकांच्या तक्रारीनंतर, रेस्टॉरंटची तपासणी केल्यानंतर पापा पाचो दा ढाबा तात्पुरता बंद करण्याची नोटीस जारी केली आहे. त्यामुळे रेस्टॉरंट मालकाला चांगलाच दणका बसला आहे. रेस्टॉरंटमध्ये अनेक बाबतीत अनियमितता आढळून आल्याचे महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाला आढळून आले आहे. त्यामुळे सर्व आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होईपर्यंत रेस्टॉरंटचे दरवाजे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे एफडीएने सांगितले.


"पापा पांचो दा ढाब्याला भेट दिलेल्या एफडीएच्या पथकाला पाण्याच्या गुणवत्ते बाबतीतही कमतरता आढळून आली. पाण्याची तपासणी वर्षातून दोनदा व्हायली हवी ती होत नव्हती. आवश्यकतेनुसार वार्षिक अन्न सुरक्षा अहवाल देण्यातही रेस्टॉरंट अयशस्वी ठरले. याव्यतिरिक्त, 21 कर्मचार्‍यांपैकी फक्त दहाच कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय नोंदी ठेवण्यात आल्या होत्या. तसेच रेस्टॉरंटच्या बिलात परवाना क्रमांक नव्हता," असे एफडीएचे सहआयुक्त शैलेश आढाव यांनी सांगितले. एफडीएने रेस्टॉरंटमधून ताज्या अन्नाचे नमुने घेतले आहेत, ज्यात तक्रारदारांनी ऑर्डर केलेल्या त्याच डिशचाही समावेश आहे, असाही खुलासा अधिकाऱ्यांनी केला आहे.



नेमकं काय घडलं?


दिंडोशी परिसरातील रहिवासी अनुराग दिलीप सिंग (40) हे 13 ऑगस्ट रोजी ते वांद्रे येथील पापा पांचो दा ढाबा रेस्टॉरंटमध्ये गेले होते. त्यावेळी जेवणासाठी त्यांच्यासोबत त्यांचा मित्र अमीन खान (40) देखील होते. त्यावेळी ढाब्यामध्ये ऑर्डर केलेल्या चिकन डिशमध्ये उंदराचे पिल्लू आढळून आले. सुरुवातीला हे त्यांच्या लक्षात आले नाही आणि तो कोंबडी मांसाचा तुकडा आहे असे वाटल्याने त्यांनी त्यातील काही भाग खाऊन देखील टाकला. मात्र त्यानंतर जवळून पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की तो उंदीर आहे. आम्ही याची कर्मचाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी माफी मागितली. पण त्यानंतर पुढील 45 मिनिटे होऊन सुद्धा व्यवस्थापक पुढे आला नाही.
त्यानंतर हॉटेल व्यवस्थापक व्हिव्हियन अल्बर्ट सिक्वेरा (40) यांना फोन करुन बोलावून घेतले आणि त्यांना ताटातील उंदीर दाखवला. त्यावेळी व्यवस्थापक व्हिव्हियन अल्बर्ट सिक्वेरा समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यानंतर अनुराग सिंग यांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी सिक्वेरा आणि दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. तिघांवर भारतीय दंड संहिते कलम 272 आणि 336 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर तिघांना जामिनावर सोडण्यात आले होते.