कल्याण- डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी; आता प्रवासाचा वेळ कमी होणार, ठाणेकरांचाही फायदा
Thane News : देशभरात मागील काही वर्षांमध्ये रस्ते मार्गानं होणाऱ्या प्रवासामध्ये कमालीचे बदल झाले. मुख्य म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळं याचा फायदा नागरिकांना होताना दिसला.
Thane Nashik Travel Time : कल्याण किंवा डोंबिवली (Kalyan, Dombivli) मार्गानं प्रवास करत पुढे जायचं म्हटलं किंवा अगदी रस्ते मार्गानं ठाणे ओलांडून जाण्याचा विचारही केला तरीही अनेकांच्याच चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्हं उभं राहतं. या चिंतेमागे कारण असतं ते म्हणजे या भागात प्रचंड प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी. येत्या काळात मात्र या प्रश्नावर तोडगा निघण्याची चिन्हं आहेत. इतकंच नव्हे, तर यानिमित्तानं ठाणे- नाशिक प्रवासही अधिक सुकर आणि वाहतूक कोंडीमुक्त होणार आहे.
मुख्य ठाणे- नाशिक मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवत कल्याण, डोंबिवली, ठाणे मार्गावरील प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी एमएमआरडीए (MMRDA) अर्थात मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने ठाणे-पडघा उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. एमएमआरडीएच्या या निर्णयानुसार सध्या या रस्त्याचा सविस्तर आराखडा तयार केला जात आहे. यासाठी सल्लागार नियुक्तीअंतर्गत निविदाही मागवण्यात आल्या आहेत.
कल्याण- डोंबिवलीकरांची वाहतूक कोडीतून सुटका
ठाणे-नाशिक महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये- जा सुरु असते. हा अतिशय महत्त्वाचा आणि तितक्याच गर्दीचा प्रवासमार्ग आहे. याच दरम्यान येणाऱ्या भिवंडी, शहापूर भागात मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गोदामं आणि कारखाने तयार झाल्यामुळं या वाटेवर दर दिवशी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं. इतकंच नव्हे, तर इथून भिवंडी, कल्याण, डोंबिवली या ठिकाणांवर पोहोचण्यासाठी प्रवास करणाऱ्यांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यामध्ये प्रवासासाठी बराच वेळ खर्ची घालावा लागतो. पण आता मात्र या समस्येवर लवकरच तोडगा निघणार असून वाहनधारक आणि प्रवाशांचा मनस्ताप कमी होणार आहे.
हेसुद्धा वाचा : Political News : संजय निरुपम भाजपच्या वाटेवर? राज्यात आणखी एका राजकीय भूकंपाची शक्यता
ठाणे ते पडघा हा 30 किमी अंतराचा उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतल्यामुळं ही समस्या मिटणार आहे. दरम्यान, या रस्त्यासाठीचा आराखडा आणि त्यानंतर त्याचं काम सुरू होण्यास बराच वेळ जाणार आहे. हा उन्नत रस्ता तयार झाल्यानंतर इथून प्रवास करण्यासाठी वाहनधारकांकडून टोल आकारण्यात येणार आहे. पुढे हाच रस्ता मुंबई- नागपूर समृद्धी मगामार्गाला जोडला जाणार असल्यामुळं मुंबईतून बाहेर पडण्यासाठीचा आणखी एक मोठा मार्ग प्रवाशांसाठी तारणहार ठरणार हे नक्की.