48 तासात Worli Hit and Run चा आरोपी मिहिर शाह गजाआड; मुंबई पोलिसांनी कसं केलं ट्रॅक? A To Z अपडेट
Mumbai News : हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी वरळी येथील अपघातातील आरोपी मिहिर शाह याला ताब्याक घेतलं असून, आता पुढील कारवाई सुरू केली आहे.
Mumbai News : वरळी हिट अँड रन प्रकरणी पोलीस यंत्रणांनी घटनेची माहिती मिळाल्याक्षणापासून आरोपीचा शोध घेण्याचं काम हाती घेतलं. सर्व शक्यता तपासत चौकशीला वेग आला आणि सुरुवातीला आरोपी मिहिर शाह याचे वडील, शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली. अखेर बीएमडब्ल्यूनं दुचाकीवर असणाऱ्या दापम्पत्याला धडक दिल्याप्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाह (24) याला मुंबई पोलिसांनी विरारमधून ताब्यात घेतलं. (Worli Hit and Run)
रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर आरोपीनं पळ काढला होता. ज्यानंतर त्याचा शोध घेण्याचं काम सुरु झालं. अनेक सूत्रांचा वापर होऊनही मिहिरचा थांगपत्ता लागला नव्हता, इथं या हिट अँड रन प्रकरणात कावेरी नाखवा यांचा मृत्यू ओढावल्यामुळं प्रकरण चिघळलं आणि अखेर पळ काढून गेलेल्या आरोपीला गजाआड करण्यात मुंबई पोलिसांना यश मिळालं. मुंबई पोलिसांच्या तब्बल 11 पथकांनी यासाठी प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांमार्फत समोर आली.
सदर प्रकरणी मिहिरला अटक केल्यानंतर त्याच्या दोन्ही बहिणी आणि आईला ठाणे जिल्ह्यातील शहापूर पोलीस ठाण्यात चौकशी केल्यानंतर मुंबईत आणलं गेलं. पीटीआयच्या माहितीनुसार मिहिर शाहची आई आणि बहिणींसमवेत इतर 10 जणांची पोलीस चौकशी करण्यात आली.
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार या भीषण अपघातानंतर झालेल्या या अपघातानंतर मिहिरनं गाडीचा ताबा चालकाकडे दिला आणि घटनास्थळावरून त्यानं पळ काढला. त्यानं ऑटोरिक्षाचा वापर करत पुढील ठिकाण गाठत कार आणि कारचालकाला कलानगर इथंच मागे सोडलं. पुढं मिहिर त्याच्या मैत्रिणीच्या घरी गोरेगाव येथे गेला. मिहिरच्या मैत्रिणीनं त्यानंतर त्याच्या बहिणीशी संपर्क साधला. ज्यानंतर ती गोरेगावला पोहोचली आणि तिनं मिहिरसह त्य़ाच्या मैत्रिणिला तिच्या बोरिवली येथील निवासस्थानी नेलं.
हेसुद्धा वाचा : Worli Hit and Run प्रकरणातील आरोपीच्या वडिलांनीच... पोलीस चौकशीतून खळबळजनक खुलासा
तिथं पोहोचल्यानंतर शाह कुटुंबीयांनी ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे असणाऱ्या त्यांच्या रिसॉर्सटला जाण्याचं ठरवलं. तिथं मिहिर शाहची आई मीना, बहिणी किंजल आणि पूजा आणि दोन मित्रही वास्तव्यास असल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, इथं मिहिरच्या एका मित्राची मुंबई पोलिसांना ओळख पटताच त्यांनी त्याच्याशी दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधणअयाचा प्रयत्न केला. पण, मित्राचा फोन स्विच ऑफ येऊ लागल्याचं लक्षात आलं.
शहापूरहून पलायन...
8 जुलैच्या सायंकाळी मिहीर आणि इतर दोघांनी शहापूरच्या रिसॉर्टहून निघत विरार गाठलं. ज्यावेळी त्याच्या मित्रानं 15 मिनिटांसाठी मोबाईल सुरु केला होता तेव्हाच पोलिसांनी हा मोबाईल ट्रॅक केला आणि मोबाईलचं अचूक लोकेशन मिळवत या दोघांना ताब्यात घेण्यासाठी तातडीनं हालचाली केल्या आणि या आरोपीला ताब्यात घेतलं.
पोलिसांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार अपघातापूर्वी आरोपी मिहिरनं जुहू भागातील एका बारमध्ये मित्रांसमवेत पार्टी केली आणि रविवारी भल्या पहाटे तो दक्षिण मुंबईला गेला. मरिन ड्राईव्ह भागात त्याला पहाटे 4 वाजून 30 मिनिटांनी पाहिलं गेलं, जिथं तो बीएमडब्ल्यू कार चालवत होता, तर चालक राजऋषी बिडावत हा त्याच्या शेजारी बसला होता. ही कार वरळी येथे पोहोचली तेव्हाच कारनं दुचाकीला भयंकर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की जबर दुखापतीमुळं यामध्ये कावेरी नाखवा यांचा मृत्यू ओढावला, तर त्यांचे पती प्रदीप नाखवा गंभीररित्या दुखापतग्रस्त झाले. सदर प्रकरणी सर्वत स्तरांतून संतापाची लाट उसळली असून, आता दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृतांच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे.