Mumbai News : 'दहा नव्हे तर पाच वर्षांपूर्वीची मुंबई आणि आजची मुंबई यामध्ये प्रचंड फरक पडला आहे', असं आपल्याकडे अनेकजण म्हणताना दिसतात. किंबहुना तुमचाही यावर विश्वास बसत असेल. कारण, हा अनुभव तुम्हीही प्रत्यक्ष घेतला असेल. शहरात होणाऱ्या अनेक बदलांसोबत नागरिकांना आव्हानात्मक वाटणारी आणखी एक परिस्थिती आणि त्याहूनही आणखी एक समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरातील दक्षिण मुंबईचा भाग म्हणू नका किंवा मग मध्य मुंबई आणि उपनगरं म्हणू नका. महत्त्वाच्या तासांनाच नव्हे तर आता जवळपास दिवसातील बहुतांश वेळेस रस्त्यांवर वाहनांची गर्दी पाहायला मिळते. आता हा त्रास आणखी वाढणार आहे. कारण, एका महत्त्वाच्या पुलावरील वाहतूक 4 दिवसांसाठी बंद राहणार आहे. 


कुठे बंद असेल वाहतूक? 


ऐरोली- कटई या पुलाच्या बांधकामादरम्यान ऐरोली ते मुलुंड मार्गावरील पुलाचे गर्डर टाकण्याचं काम आता सुरु करण्यात आलं आहे. ज्यामुळं 4 ते 7 ऑक्टोबरदरम्यान रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत ही कामं हाती घेण्यात येणार आहेत. दरम्यानच्या काळात या वेळेत ऐरोलीतून मुंबई, मुलुंड आणि ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या अवजड आणि जड वाहनांच्या वाहतुकीवर  बंदी घालण्यात येणार आहे. 


हेसुद्धा वाचा : RBI च्या महत्त्वाच्या घोषणेआधीच HDFC सह 'या' बँकांच्या व्याजदरात बदल; तुमचं खातं इथं आहे का? 


नवी मुंबई वाहतूक विभागाच्या माहितीनुसार पर्यायी मार्ग म्हणून या वाहनांना महापे, शिळफाटा आणि मुंब्रामार्गे प्रवास करता येणार आहे. तर, मुंबई, मुलुंड आणि ठाण्याहून ऐरोलीमार्गे नवी मुंबईत येणाऱ्या वाहतुकीसाठी वाशी खाडी पूल किंवा मुंब्रा बायपास शिळफाटामार्गे नवी मुंबईत येण्याची मुभा ठेवण्यात आली आहे. 


वाहतूक विभागानं महत्त्वाची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरीही या नियमातून अवजड वाहनं वगळता फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या वाहनांना मात्र इथून प्रवासाची मुभा असेल. अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाही इथं प्रवासाची परवानगी आहे. दरम्यान नागरिकांनी यंत्रणांनी दिलेल्या सूचना पाहूनच प्रवास करावा असंही आवाहन सध्या करण्यात येत आहे.