राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ तृतियपंथीयांचा मोर्चा, भाजप कार्यालयावर धडक
राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात तृतीयपंथीयांचा मुंबईत मोर्चा
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या समर्थनार्थ मुंबईत तृतियपंथीयांनी मोर्चा काढला. भाजपा कार्यालयावर धडक मोर्चा काढत तृतीयपंथीयांनी केंद्र सरकारच्या कारवाईचा निषेध केला. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीविरोधात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी तृतीयपंथीयांनी केंद्र सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी पोलिसांनी तृतीयपंथीयांचा मोर्चा अडवत ताब्यात घेतलं. तृतीयपंथी ईडीच्या कार्यालयावर मोर्चा काढणार होते, पण अचानक त्यांनी आपला मोर्चा भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या दिशेने वळवला. भाजप कार्यालयात त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाजप कार्यालयाबाहेर असलेल्या पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मोर्चा काढणाऱ्या तृतीयपंथीयांना ताब्यात घेतलं.
राहलु गांधी यांची ईडी चौकशी
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी सलग तीन दिवस चौकशी करण्यात आली. ईडीने राहुल गांधी यांची तीन दिवस 30 तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी केली. या चौकशीदरम्यान राहुल गांधी यांची बँक खाती, परदेशी मालमत्ता आणि यंग इंडियन आणि असोसिएट जर्नल लिमिटेडला दिलेल्या कर्जाबाबत चौकशी करण्यात आली.
दरम्यान, ईडीच्या चौकशीविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून देशभरात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली.