Uddhav Thackeray on PM Modi Mumbai Road Show: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी मुंबईमधील घाटकोपरमध्ये 'रोड शो'च्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन केलं. पंतप्रधानांच्या या 'रोड शो'मुळे सकाळपासूनच मुंबईतील अनेक रस्त्यांवरील वाहतूक अंशत: किंवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मोदींचा 'रोड शो' सायंकाळी पार पडला तरी सुरक्षेचा उपाय म्हणून दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत घटाकोपर आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक रस्ते बंद करुन वाहतूक इतर मार्गांनी वळवण्यात आली होती. तसेच काही काळ मुंबई मेट्रोही सुरक्षेचं कारण देत बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे गटाने मुंबईकरांना अशाप्रकारे वेठीस ठरुन पंतप्रधानांना आर्थिक राजधानीमध्ये प्रचार करण्याची गरज होती का? असा सवाल उपस्थित केला आहे.


लोकांना वेठीस धरून प्रचाराची काय गरज?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"अलीकडे श्रीमान मोदी हे महाराष्ट्रात जवळ जवळ मुक्कामी असल्यासारखेच आहेत. एकट्या बुधवारच्या दिवशीच पिंपळगाव, बसवंत, कल्याण, भिवंडी, मुंबईतले ‘रोड शो’ अशा त्यांच्या जंगी कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. मुळात मोदी हे दिल्ली सोडून सतत महाराष्ट्रात येत आहेत ते पराभवाच्या भीतीने. मोदी हे प्रतिशिवाजी आहेत व छत्रपती शिवरायांप्रमाणे ते महाराष्ट्रात पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करतील अशा भ्रमात त्यांचे लोक असतील तर ते तितकेसे खरे नाही. मोदी हे मुंबईत राजकीय रोड शोसाठी येत असले तरी पंतप्रधानपदाचा लवाजमा घेऊन आले व त्यांच्या रोड शोच्या निमित्ताने अर्धी मुंबई पोलिसांनी बंद करून ठेवली," असा टोला 'सामना'च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.


"अनेक रस्त्यांवरची वाहतूक दिवसभर बंद केली. काही मार्ग वळवले. मोदी जेथे जाणार तेथील दुकाने, टपऱ्या, लहान व्यवसाय बंद करण्यात आले. रिक्षावाले, टॅक्सीवाले यांच्या पोटावर मारून त्यांना तेथे फिरकू दिले नाही. आजूबाजूच्या अनेकांच्या खिडक्या बंद करून ठेवण्यास सांगितले. मुंबई मेट्रो सेवादेखील संध्याकाळी अचानक बंद केली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. लोकांना अशा प्रकारे वेठीस धरून कार्यवाहक पंतप्रधानांना मुंबईत प्रचार करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे काय?" असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.


नक्की वाचा >> 'मोदी-शहांच्या डोक्यात वळवळणारे महाराष्ट्रद्वेषाचे किडे..'; 'जिरेटोप'वरुन ठाकरे गटाचा घणाघात


त्या 18 बळींबद्दल मोदींनी विचारलं का?


"ही प्रचाराची बादशाही किंवा शहेनशाही पद्धत लोकशाही किंवा निवडणूक आचारसंहितेच्या कोणत्या कलमात बसते ते आपल्या महान निवडणूक आयोगाने एकदा स्पष्ट करावे. मुंबईचे रस्ते अडवून व ताब्यात घेऊन लोकांचा छळ करून असा प्रचार करणे हे अमानुष व संवेदनाहीनतेचे लक्षण आहे. घाटकोपरमधील होर्डिंग्ज दुर्घटनेत आतापर्यंत 18 जणांचे बळी गेले आहेत. आजही अनेक जण त्या ढिगाऱ्याखाली अडकून पडले असावेत अशी भीती व्यक्त होत आहे. मुंबई महापालिकेत आता तीनेक वर्षांपासून भाजपचेच राज्य सुरू आहे. मुंबईतील एक बिल्डर पालकमंत्री लोढा यांनी तर त्यांचे कार्यालय महापालिकेतच थाटले, तेव्हा पालिकेचे सध्याचे कारभारी हेच घाटकोपरच्या होर्डिंग्ज दुर्घटनेस जबाबदार आहेत. घाटकोपरमधील या दुर्घटनेत 18 बळी का गेले? याबाबत मोदी यांनी त्यांच्या लोकांना प्रश्न केला असेल काय?" असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.


माणुसकीची अपेक्षा करणे चूक


"गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात नवी मुंबईतील खारघर येथे झालेल्या श्री सेवकांच्या मेळाव्यास गृहमंत्री शहा हजर होते. त्या वेळीही पन्नासेक श्री सेवक उन्हात तडफडून व गुदमरून मृत झाले होते. या दुर्घटनेबाबतही वरवरचा अश्रुपात करून सर्वच प्रकरण रफादफा केले गेले. सूर्य आग ओकत असताना त्या भर उन्हात असे कार्यक्रम करणे, त्या कार्यक्रमास देशाच्या गृहमंत्र्यांनी हजेरी लावणे आणि चेंगराचेंगरीत लोक मरत असताना दिल्लीस पलायन करणे, हे संवेदनाहीनतेचेच लक्षण होते; पण भाजप परिवार व संवेदना यांचे विळ्या-भोपळ्याचे नाते असल्याने त्यांच्याकडून किमान माणुसकीची अपेक्षा करणे तसे चूकच आहे," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.